महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'आपण हसायचे दुसऱ्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला' IFSC मुद्द्यावरुन आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका - Ashish Shelar critisese shivsena and congress

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) मुख्यालय मुंबई ऐवजी गुजरातमधील गांधीनगर येथे करण्याच्या केंद्राच्या भूमिकेनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

BJP MLA Ashish Shelar
भाजप आमदार आशिष शेलार

By

Published : May 3, 2020, 4:22 PM IST

मुंबई - 'आपण हसायचे दुसऱ्याला अन शेंबूड आपल्या नाकाला' या शब्दात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे यांच्यासह उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी, मुंबई येथे होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) गुजरातला हलवल्यानंतर भाजपवर टीकेची झोड उठवली होती. त्याला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा...मुंबईत होणारे 'IFSC' केंद्र गुजरातमध्ये हलवले ! केंद्राच्या निर्णयानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु

शिवसेनेवर जहरी भाषेत टीका...

'काहीजण काँग्रेसच्या तालावर आज टिपऱ्या खेळत आहेत. आता आयएफएससीवरून बेंबीच्या देठापासून जे ओरडत आहेत, शंख करीत आहेत. कोल्हेकुई करीत आहेत, त्यांची अवस्था तर 'आपण हसायचं दुसऱ्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला' अशी झाली आहे, अशा भाषेत शेलार यांनी शिवसेनेला सुनावले आहे.

काय म्हणाले आशिष शेलार?

आघाडी सरकार असताना 2007साली आयएफएससी संदर्भात प्रस्ताव दाखल झाला होता. त्यानंतर 2014पर्यंत तत्कालीन आघाडी सरकारने याचा कोणताही पाठपुरावा केला नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015साली याचा पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुलात आयएफएससी मुख्यालयाची जागा निर्धारित करून बुलेट ट्रेनच्या स्टेशनचा आराखडा करण्यात आला होता. या बुलेट ट्रेनलादेखील विरोध करण्यात आला. कोणताही प्रकल्प आला तरी त्यावेळी विरोधाच्या फुगड्या कोण घालतं, असा सवाल शेलार यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आयएफएससीचे मुख्यालय मुंबई येथे असणे संयुक्तिक असल्याचे म्हणत केंद्राच्या घोषणेला विरोध दर्शवला आहे. जेव्हा राज्यात आघाडी सरकार आणि संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना आयएफएससी निर्मितीचा प्रस्ताव प्रलंबित होता, त्यावेळी तत्कालीन सरकारने याबाबतीत का निर्णय घेतला नाही, असा सवाल शेलार यांनी पवार यांना केला आहे. तसेच मुंबई हे आर्थिक केंद्र असावे, ही आमचीदेखील भूमिका आहे. आता याबाबत योग्य भूमिका घेऊन अजूनही मुंबई मध्ये आयएफएससी केंद्र आणण्यासाठी प्रयत्न करता येईल, असेही शेलार यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details