मुंबई- भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज ( BJP Leader Mohit Kamboj ) यांच्याविरोधात बुधवारी सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये ( Santa Cruz Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विरोधात मोहित कंबोज यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा याकरिता आज याचिका दाखल करण्यात आली ( Mohit Kamboj Petition In High Court ) आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी अपेक्षित आहे.
कोरोना नियमांचे उल्लंघन, शस्रही बाळगले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक व विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी अटक केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते तथा नेत्यांकडून जल्लोष करण्यात येत होता. त्यावेळी मोहित कंबोज यांच्या समर्थकांसह मोहित कंबोज यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे कोरोना नियमाचं उल्लंघन करणे तसेच शस्त्र बाळगणे या प्रकरणात सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा राजकीय हेतूने असल्याचा दावा
मोहित कंबोज यांनी त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा राजकीय हेतूने दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा रद्द करण्यात यावा याकरिता मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये राज्य सरकार प्रतिवाद करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोहित कंबोज आणि महाविकास आघाडीतील नेते हे आमने-सामने पाहायला मिळत आहेत. ते नवाब मलिक असो की, संजय राऊत. मागील आठवड्यातच संजय राऊत यांनीही मोहित कंबोजच्या आर्थिक व्यवहारा संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये मोठा खुलासा केला होता.
हेही वाचा - नवाब मलिकांच्या अटकेनंतर मोहित कंबोजचा तलवार नाचवून जल्लोष
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडीने ) अटक केली ( Nawab Malik Arrested ). जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर ईडीने ही अटकेची कारवाई केली. त्यानंतर भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी तलवार काढून जल्लोष केला. त्यानंतर पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन आणि शस्र बाळगल्याप्रकरणी मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.