मुंबई -‘मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’ हा नाना पटोले यांचा खुलासा धादांत खोटारडेपणा आहे’, असा आरोप महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. ‘नाना पटोलेंनी या गावगुंडाचे छायाचित्र आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी, असे आव्हानही भांडारी यांनी केले आहे.
हेही वाचा -ACB summoned : परमवीर सिंग हाजीर हो... लाचलुचपत विभागाने बजावले आदेश
कायद्याचे राज्य ही कल्पनाच काँग्रेसला मान्य नाही
स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची भाषा सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष वापरत नाही. हे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे खरे चित्र आहे, असे स्पष्ट करून माधव भांडारी यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष कायद्याचे संरक्षण जनतेला देऊ, असे न म्हणता कायदा झुगारून खून करण्याची भाषा वापरतो, ही वस्तुस्थिती भयावह आहे.
कायद्याचे राज्य ही कल्पनाच काँग्रेसला मान्य नाही आणि केवळ खूनखराब्याचे राजकारण करणे हाच काँग्रेसचा स्वभाव आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. केवळ हिंसाचारावर अवलंबून असणाऱ्या काँग्रेस संस्कृतीचे नाना पटोले हे अस्सल प्रतिक आहेत, अशी टीका देखील भंडारी यांनी केली.
नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात नाना पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. या वक्तव्याचा निषेध होत असताना आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विटद्वारे नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पटोले यांनी वापरलेली भाषा निंदनीय असल्याचेही गडकरी म्हणाले.
नाना पटोले यांची सारवासाराव
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, मी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून असे बोललो नाही, असे सांगितले. मोदी नावाच्या गावगुंडाबद्दल बोललो होतो. मोदी नावाचा गुंड आहे, त्या विषयी मी असे वक्तव्य केले होते, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न नाना पटोले यांनी केला असला तरी, भाजपने या मुद्द्यावर राजकारण तापवले आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी या प्रकरणी आक्रमक झाले असून, त्या गावगुंडांची संपूर्ण माहिती नाना पटोले यांनी उघड करण्याची मागणी माधव भंडारी यांनी केली.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
तब्बल तीन तासांनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी कोराडी पोलीस स्टेशनच्या आवारातून ताब्यात घेतले. सकाळपासूनच बावनकुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करणे, एफआयआर कॉपी देण्याची मागणी करत होते. हटण्यास तयार नसल्याने अखेर पोलिसांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
मुंबईत भाजप आक्रमक
नाना पटोले यांच्या विरोधात मुंबईतील विविध भागात भाजप नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. मुंबईतील बोरिवलीमध्ये भाजपचे सरचिटणीस सुनील राणे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांच्या फोटोला चप्पल मारून त्यांचा निषेध केला. यावेळी महिलांनी नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार मोर्चा उघडला आणि नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.
नाना पटोले यांच्या मुंबईतील घराबाहेर सुरक्षेत वाढ
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे. नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला असल्याने नाना पटोले यांच्या नागपूर आणि मुंबईतील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार
नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्यात भाजपच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी आणि पक्षाचे माजी शहराध्यक्ष तुषार भारतीय यांच्या नेतृत्वात राजापेठ पोलीस ठाण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित पोलीस उपायुक्त साळी यांच्याकडे तक्रार देताना नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी शिवराय कुळकर्णी आणि तुषार भारती यांनी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातच ठिय्या देण्याची भूमिका भाजपच्या वतीने घेण्यात आली आहे.
शहराच्या विविध पोलीस ठाण्यात तक्रारी
शहरातील बडनेरा, राजापेठ, शहर कोतवाली, गाडगेनगर अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये भाजपच्या वतीने नाना पाटोले यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली आहे. नाना पटोले यांना बेड्या घालून अमरावतीच्या न्यायालयात हजर करावे, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
भंडारा - गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी पटोलेंच्या अटकेची केली मागणी
संपूर्ण महाराष्ट्रात नाना पटोले यांच्या वक्तव्याविरुद्ध संताप व्यक्त केला गेला. भंडारा - गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी कार्यकर्त्यांसह भंडारा पोलीस स्टेशनमध्ये नाना पटोले यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. सुनील मेंढे यांनी भंडारा पोलीस स्टेशन येथे कार्यकर्त्यांसह तळ ठोकत नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून चौकशीनंतर कोणती कार्यवाही करावी ते ठरविल्या जाईल, असे सांगितले.
हेही वाचा -High Court Decision: गावित बहिणींना जन्मठेप, उच्च न्यायालयाचा निर्णय