मुंबई- केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने सामील झालेल्या महाराष्ट्राच्या चारही मंत्र्यांकडून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात झालेली आहे. दिल्लीच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ही जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिका निवडणुका समोर ठेवून जन आशीर्वाद यात्रा काढल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्र सरकारमध्ये नव्याने सामील झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या महाराष्ट्रातील चार मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा भारतीय जनता पक्षाकडून काढण्यात आली आहे. 16 ऑगस्टपासून ही जनआशीर्वाद यात्रा सुरु झाली असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचा पालघर पासून दौरा सुरू झाला आहे. तर तिथेच केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी 16 ऑगस्टपासून ठाणे जिल्ह्यामध्ये जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. तर दुसरीकडे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे बीडमधून आपल्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करत आहेत. तर तिथेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जन आशीर्वाद यात्रेसाठीचा कोकण दौरा 19 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
का काढली जनआशीर्वाद यात्रा?
केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने सामील झालेले या नव्या मंत्र्यांना भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून जनआशीर्वाद यात्रा काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात जाऊन लोकांचा आशीर्वाद घेऊन भारतीय जनता पक्षाबद्दल सामान्य माणसांमध्ये विश्वास वाढवण्यासाठीची कामगिरी आता या नवीन चार मंत्र्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात अजून उत्साहा निर्माण करण्याचे काम होणार असल्याचे मतं राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी मांडल आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधी पक्षात बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमधून विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या व्यतिरिक्त इतर नेते जनतेशी थेट संवाद साधताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातले नव्याने झालेले मंत्री थेट जनतेशी संवाद साधणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने याबाबत विचार केला असल्याचं मतं ही राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी व्यक्त केले.