महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vidhan Parishad BJP Candidates : विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पाच नावे जाहीर; जाणून घ्या, उमेदवारांबद्दल... - विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे पाच उमेदवार

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी (Vidhan Parishad Election 2022) 20 जूनला निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर (Vidhan Parishad BJP Candidate) केली आहेत. यामध्ये प्रवीण यशवंत दरेकर, राम शंकर शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे, प्रसाद मिनेश लाड यांना उमेदवारी दिली आहे.

vidhan parishad election 2022
विधानभवन फाईल फोटो

By

Published : Jun 8, 2022, 4:56 PM IST

Updated : Jun 11, 2022, 3:09 PM IST

मुंबई -20 जून रोजी होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2022) दहा जागांसाठी भाजपकडून पाच उमेदवारांची नावे (BJP Candidates Vidhan Parishad Election) घोषित करण्यात आली आहेत. वास्तविक या निवडणुकीसाठी भाजपकडून अनेक इच्छुक रिंगणात होते. विशेष करून यामध्ये भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे, त्याचबरोबर भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ, भाजप उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांचीही नावे चर्चेत होती. पण शेवटी यांना वगळण्यात आले. प्रवीण यशवंत दरेकर, राम शंकर शिंदे, श्रीकांत भारतीय, श्रीमती उमा गिरीश खापरे व प्रसाद मिनेश लाड यांचा समावेश आहे.

कोण आहेत प्रवीण दरेकर? -मनसेचे आक्रमक नेते म्हणून प्रवीण दरेकर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होते. २००९ मध्ये मनसेने निवडणूक लढवली. त्यावेळी दरेकर पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. मुंबईतल्या मागाठाण्यातून त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. २००९ ते २०१४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. नंतर झालेल्या निवडणुकीत मोदींच्या लाटेचा मोठा फटका महाराष्ट्रात मनसेलाही बसला. २०१४च्या निवडणुकीत दरेकर यांच्यासह मनसेचे अनेक शिलेदार पराभूत झाले. त्यानंतर मनसेला गळती लागण्यास सुरुवात झाली. अनेक नेत्यांनी भाजपकडे मोर्चा वळवला. त्यातच दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेचा घोटाळा बाहेर आल्यानंतर चौकशी सुरू झाली. त्यानंतर २०१५ मध्ये दरेकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या खास मर्जीतले दरेकर झाले. त्यामुळे अनेक दिग्गजांना डावलून फडवणीस यांनी त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावली. एवढेच नव्हे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदही त्यांना दिले गेले. आता भाजपने पुन्हा त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावून त्यांचे विरोधी पक्षनेते पदही कायम ठेवलं आहे.

कोण आहेत राम शिंदे? -नगर जिल्ह्यातील माजी मंत्री व भाजप नेते प्रा. राम शिंदे यांना पक्षाने विधान परिषदेवर संधी दिली आहे. शिंदे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि ओबीसी समाजाचे नेते आहेत. मंत्री असताना अनेक खाती सांभाळण्याचा अनुभव त्यांच्याकडे असून पक्षात विविध पदांवर कामाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांना परिषदेवर आमदारकी मिळावी अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांडून व्यक्त केली जात होती. यापूर्वी कर्जत-जामखेड मतदारसंघातून शिंदे आमदार होते. युतीच्या सरकारमध्ये ते मंत्री झाले. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.

कोण आहेत श्रीकांत भारतीय? -विधान परिषदेच्या स्पर्धेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलत भाजपने श्रीकांत भारतीय यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. श्रीकांत भारतीय हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. भाजपचे अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे फडणवीसांचे ओएसडी होते. भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वॉर रुमचे ते प्रमुख होते. शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांपैकी ते एक आहेत.

कोण आहेत उमा खापरे? -उमा खापरे या भाजपच्या अत्यंत आक्रमक नेत्या आहेत. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी भाजपमध्ये महिला मोर्चा प्रदेश सचिवपदासह संघटनेत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. भाजपमधील जुन्या नेत्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणूनही ओळखल्या जातात. उमा खापरे या पिंपरी-चिंचवडच्या आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका म्हणून चांगले काम केलं आहे. सलग दोनवेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलं आहे. २००१-२००२ मध्ये त्या पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या.

कोण आहेत प्रसाद लाड ? -एकेकाळचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळांचे खंदे समर्थक असणारे प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादीची सत्ता जाताच भाजपामध्ये प्रवेश केला. २०१४ ची विधानसभा निवडणूक त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीकडून लढविली आणि ते भाजपाकडून पराभूत झाले होते. त्यानंतर काही महिन्यांत झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ते अपक्ष लढले. त्या वेळी भाजपाने त्यांना पाठिंबा दिला; पण ते केवळ दोन मतांनी पराभूत झाले. मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठीची ती निवडणूक होती. त्यात शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने लाड हे तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे झाले. २०१७ साली भाजप नेते नारायण राणे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रसाद लाड विजयी झाले. प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातिल एक नेते आहेत. महाविकास आघडी सरकारवर प्रहार करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. पक्षाने त्यांना पुन्हा एकदा आमदारकीची संधी दिल्याने त्यांच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा -Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी; 20 जूनला मतदान

Last Updated : Jun 11, 2022, 3:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details