मुंबई -मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी राजकीय दबावाखाली पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून संवैधानिक नियम, निर्देश धाब्यावर बसवत लोकशाही मूल्य पायदळी तुडवून प्रभाग रचनेत केलेल्या अन्याय फेरफार घोटाळयाबाबत आणि त्याद्वारे मुंबईकरांच्या केलेल्या फसवणुकीबाबत आज भाजप नगरसेवकांनी गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गांधी टोपी घालून महापालिका आयुक्तांना गुलाबपुष्प देत अनोखे 'गांधीगिरी आंदोलन' केले. यावेळी वेळ पडल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
प्रभाकर शिंदे - गटनेते, भाजप - आयुक्तांच्या संगनमताने बदल -
मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखडा पालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. शिवसेनेने एका बाह्य खासगी एजन्सीकडून आपल्याला अनुकूल अशी प्रभाग रचना बनवून रातोरात आयुक्तांच्या संगनमताने पेन ड्राइव्ह बदलल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. यामध्ये प्रभागांच्या सीमारेषांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकिय सोयीसाठी बेकायदेशीर फेरफार करण्यात आला आहे. या पुनर्रचनेमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे. पश्चिम उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये मोठा फेरफार करण्यात आल्याचा दावाही भाजपने केला आहे.
नवी प्रभाग पुनर्रचना सत्ताधारी शिवसेनेने केवळ आपला राजकीय फायदा पाहून केली आहे. भ्रष्टाचाराची गटारगंगा अव्याहत वाहत ठेवण्यासाठी पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठीच केली असल्याची टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे म्हणून निवडणूक आयोगाने याबाबत पावले उचलून प्रभाग आराखड्याची पडताळणी नि:पक्षपातीपणे करावी, अशी मागणी भाजपने लेखी पत्राद्वारे केली आहे. अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील, असा इशारा गटनेते शिंदे यांनी दिला आहे.
२०१६ मध्ये राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता असताना भाजपने प्रभाग रचना बदलली होती. ही प्रभाग रचना बदली केल्याने मागील २०१७ च्या पालिका निवडणुकीत भाजपला फायदा झाला असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात होता. आता राज्यात सत्ता बदल झाल्यावर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांनी भाजपला रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी येत्या निवडणुकीपूर्वी भाजपने केलेली पुनर्रचना बदली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हेही वाचा -नवाब मलिकांचे आरोप बेछूट, याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील - भाजप नेते चंद्रकांत पाटील