मुंबई : मुंबई उपनगरात सर्वात मोठे दांडिया कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यासाठी भाजपाकडून शहर विभागात सर्वात मोठा मराठी दांडिया कार्यक्रम अभ्युदय नगर Biggest Marathi Dandiya in Abhudaya Nagar येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या मराठी गाण्यांवर रसिकांना दांडिया खेळता येणार असल्याची माहिती भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा यांनी दिली.
सर्वात मोठा मराठी दांडिया -भाजपाकडून आयोजित करण्यात आलेल्या मराठी दांदियाबाबत माहिती देताना मिहिर कोटेचा बोलत होते. यावेळी प्रसिद्ध गीतकार संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, मुंबई महापालिकेतील भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना, गेले दोन वर्षे कोरोना प्रसारामुळेसर्व सण निर्बंधांमध्ये साजरे झाले. राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपाचे सरकार स्थापन झाल्यावर गणेशोत्सव आणि दहीहंडी हे दोन्ही सण धूमधडाक्यात साजरे झाले. त्यानंतर नवरात्रोत्सव सुद्धा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. यासाठी भाजपाकडून विविध विभागात दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सव सण हा गुजराती भाषिक लोकांचा असला तरी मराठी भाषिक नागरिक सुद्धा यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात. याच अनुषंगाने भाजपाकडून यंदा अभ्युदयनगर काळाचौकी येथे शहीद भगतसिंह मैदानावर मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.
अवधूत गुप्ते गाणार -मुंबईतील सर्वात मोठा उत्सव म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जाईल, अशी या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. हा कार्यक्रम ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. आम्हाला आशा आहे कि शेवटच्या २ दिवसात सरकार रात्री १२ पर्यंत परवानगी देईल. १ ऑक्टोबरला वैशाली सामंत तसेच यानंतर अनेक कलाकार उपस्थित राहतील. प्रत्येक व्यक्तीला पास घेऊन प्रवेश मिळणार आहे अशी माहिती कोटेचा यांनी दिली. तर मुंबईत दांडियाचा मोठा कार्यक्रम व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. मुंबईकरांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच अवधूत गुप्ते यांच्यासह आम्ही दांडियाची आयोजन केले आहे. भाजपच्याया आयोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे असे भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या.
मराठी दांडिया आनंदाची गोष्ट -गायक अवधूत गुप्ते म्हणाले की, मुंबईत मराठी दांडियाचे आयोजन होत असल्याचा मला आनंद आहे. या कार्यक्रमात मला सलग गायला मिळणार आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असून त्यासाठी मी भाजपचे खूप आभार मानतो. 'सुर नवा दास नवा'च्या प्लॅटफॉर्म वर मी गरब्याचा 'भोंडला' हा गीतप्रकार गायला होता. त्यामुळे या कार्यक्रमात देखील मी 'भोंडला' गाणार आहे. या कार्यक्रमात हिंदी मराठी दोन्ही प्रकारची गाणी असणार आहेत मात्र गीतांना अधिक प्राधान्य दिले जाईल. इतर वेळी गाण्यांवर रसिक नाचतात मात्र दांडियामध्ये रसिक ज्या प्रमाणे नाचतात त्यानुसार आम्हाला गाणी सादर करावी लागणार आहेत. हे आमच्यासाठी एक आव्हान असल्याचे गुप्ते म्हणाले.