मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वीर सावरकर मार्गावरील महापौर निवास येथील स्मारकाच्या प्रकल्पाचे ऑनलाईन भूमिपूजन आज ३१ मार्च रोजी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी संबंधातील बंधने लक्षात घेऊन मोजक्या उपस्थितांसह भूमिपूजन समारंभ होणार असून त्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन - shivsena
वीर सावरकर मार्गावरील महापौर निवास येथील स्मारकाच्या प्रकल्पाचे ऑनलाईन भूमिपूजन आज ३१ मार्च रोजी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण होईल
बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभांनी गाजलेले शिवाजी पार्क मैदान एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला अथांग अरबी समुद्र या दोघांच्या मध्यभागी असलेल्या जुन्या महापौर निवास या ऐतिहासिक ठिकाणी हे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत आहे. या स्मारकामुळे जगभरातील बाळासाहेबांच्या चाहत्यांची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे, असे मत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.
स्पर्धेतून आराखडा तयार
स्मारक प्रकल्पाच्या वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून मुंबईतील सुप्रसिध्द वास्तुविशारद आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. राज्य शासनाने या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली. स्मारकासाठी भू-वापर व पर्यावरणासंबंधीच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून वास्तू उभारणीचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.