मुंबई- पुनम महाजन यांच्या लोकसभा मतदारसंघात 114 दिवसांपासून घर मिळावे, यासाठी आंदोलन सुरू आहे. त्यातील एका उपोषणकर्त्याच्या पतीचा मृत्यू होतो आणि खासदार या भागात फिरकत नाहीत. तर उपोषण स्थळापासून थोड्याच अंतरावर आयोजीत केलेल्या होळीला आदल्या रात्री महाजन येतात, अशी टीका भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी केली आहे.
पुनम महाजन यांना होळीसाठी वेळ; उपोषणकर्त्यांसाठी नाही - mumbai
पुनम महाजन यांच्या लोकसभा मतदारसंघात 114 दिवसांपासून घर मिळावे, यासाठी आंदोलन सुरू आहे.
चेंबूरच्या पंचशीलनगरमधील रहिवासी हक्काच्या घरासाठी गेल्या 114दिवसांपासून साखळी उपोषण करत आहेत. यापैकी एका उपोषणकर्त्या महिलेचा पतीचा शुक्रवारी मृत्यू झाला. रामू सुखदेव मकासरे (वय ४३) असे मुत्यू झालेल्याचे नाव आहे. ते आजारी होते. मात्र, घर मिळत नसल्यामुळे त्यांची तब्येत आणखी ढासळत गेल्याचा आरोप या उपोषणकर्त्यांनी केला आहे. त्यांच्या पत्नी या साखळी उपोषणात घर मिळवण्यासाठी लढा देत होत्या. यामुळे त्यांना त्यांच्या पतीसाठी वेळ देता आला नाही. भीम आर्मी या उपोषणकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असेही कांबळे म्हणाले.
काय आहे प्रकरण -
पंचशीलनगरमधील 300पेक्षा जास्त रहिवासी मागील 5 वर्षपासून घरांपासून वंचित आहेत. त्याचबरोबर विकासकांनी बांधलेल्या अर्धवट बांधलेल्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोय आहे. घर मिळावे यासाठी अनेक मागण्यांसाठी येथील महिला 28 नोव्हेंबरपासून बेमुदत साखळी उपोषणाला बसल्या आहेत.