मुंबई -उद्या (२ एप्रिल) गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्या हस्ते पश्चिम उपनगरात मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ हे दोन नवीन मार्ग सुरू होणार आहेत. या नवीन मेट्रोमार्गावरील प्रवाशांना घरी आणि कामावर जात यावे यासाठी बेस्टने नवीन दोन मार्ग सुरू केले आहेत. तसेच या मेट्रो स्थानकावरील बेस्ट बस थांब्यावरून नियमित बस मार्ग सुरु राहणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे.
मेट्रो २ ए साठी बसमार्ग-मेट्रो २ ए मार्ग ( Metro 2A route ) दहिसर ते डहाणूकरवाडी तर मेट्रो ७ ( Metro 7 route ) मार्ग दहिसर ते आरे दरम्यान आहे. या मेट्रो मार्गावर कांदिवली पश्चिम ते बंदर पाखाडी तसेच आरे मेट्रो स्थानक ते शिवशाही प्रकल्प ( Aarey metro to Shivshahi project ) असे दोन नवीन मार्ग असणार आहेत. कांदिवली स्थानक पश्चिम ते बंदर पाखाडी गाव या दरम्यान नवीन बसमार्ग २७४ सुरू ( Bus route 274 ) करण्यात येणार आहे. ही बस मेट्रो २ ए च्या डहाणूकरवाडी स्थानकामार्गे जाईल.
बसमार्गावरील बस कांदिवली स्थानक (पश्चिम), देना बँक, काळा मारुती मंदिर, महात्मा गांधी तरण तलाव, कांदिवली गाव, डहाणूकरवाडी मेट्रो स्थानक, कामराज नगर, नेताजी नगर पब्लिक स्कुल मार्गे बंदरपाखाडी गाव अशी जाईल. कांदिवली स्थानकातून पहिली बस ६ वाजता सुटणार आहे. शेवटची बस रात्री ९.४५ वाजता सुटेल. तर बंदर पाखाडीहून पहिली बस सकाळी ६.१५ वाजता सुटणार आहे. तर शेवटची बस रात्री १० वाजता सुटेल.