मुंबई - मुंबईकरांची लाईफलाईन असलेली बेस्ट आर्थिक संकटात ( BEST in financial crisis ) आहे. बेस्टवर ४ हजार कोटीहून अधिकचे कर्ज आहे. बेस्टची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून कुलाबा ते मुलुंड - दहिसर दरम्यानच्या जागा व्यावसायिक वापरासाठी दिल्या जाणार आहेत. तसा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला असून यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.
जागा कमर्शिअल व्यवसायासाठी -सुरक्षित व गारेगार प्रवासाची सुविधा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाची गेल्या काही वर्षांत आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे महसूल वाढवण्यावर बेस्टने भर दिला आहे. यासाठी बेस्ट उपक्रमाने नवनवीन योजना अंमलात आणल्या आहेत. बेस्ट उपक्रमाच्या शहर व उपनगरात मिळून २७ बस आगार आहेत. तर वसाहती, कार्यालये आहेत. मात्र या जागांचा हवा तसा वापर होत नसल्याने कमर्शिअल म्हणजेच व्यवसाय करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. कुलाबा ते मुलुंड - दहिसर दरम्यान बेस्ट उपक्रमाने २० ठिकाणच्या जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. यासाठी मासिक मोबदल्यावर या जागा कमर्शिअल व्यवसायासाठी दिल्या जाणार आहेत.