मुंबई - बार्ज पी 305 दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 60 वर पोहचला आहे. भारतीय नौदलाकडून अद्यापही बचावकार्य सुरुच आहे.
'बार्ज पी ३०५' : मृतांची संख्या 60 वर; पीडित कुटुंबीय आक्रमक
20:41 May 21
मृतांचा आकडा 60 वर...बचावकार्य अद्यापही सुरुच
18:29 May 21
प्रशासनाकडून कोणतीच मदत मिळेना; मृतांच्या नातेवाईकांचा आरोप
मुंबई -तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेले पी-305 हे बार्ज समुद्रात बुडाले आहे. बॉम्बे हायजवळील या बार्जमध्ये 273 कर्मचारी अडकलेले होते. याची माहिती मिळताच बचावकार्य सुरू झाले आणि दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांची नौदलाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. आतापर्यंत या घटनेमध्ये 51 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या मृतदेहांना जे जे रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आले आहे. परंतु, हे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप नातेवाइकांकडून करण्यात येत आहे.
16:47 May 21
दुर्घटनेला ओएनजीसी कंपनी जबाबदार; प्रकरणाची चौकशी होणार - मंत्री अस्लम शेख
मुंबई - एवढं मोठे वादळ येणार याची कल्पना दिली असताना, हे सगळं घडले आहे. याला पूर्णपणे ओएनजीसी जबाबदार आहे. यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ५० मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल, मग जे जे कंत्राटदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
15:34 May 21
पीडित कुटुंबीय आक्रमक
मुंबई - बार्ज पी 305 दुर्घटनेप्रकरणी पीडित कुटुंबीय आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. कंपनीकडून पाच लाख रुपये मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. आतापर्यंत कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, वीस मृतदेहांची ओळख पटली आहे, जोपर्यंत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका पीडित कुटुंबांनी घेतली आहे.
12:12 May 21
मृतांचा आकडा 51 वर..
तौक्ते चक्रीवादळात सापडलेल्या पी305 या बार्जवरील दुर्घटनेत आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झालेला आहे. यापैकी 49 मृतदेह मुंबईत आणण्यात आले असून भारतीय नौदलात तर्फे अजूनही बचाव कार्य सुरु आहे. यासाठी भारतीय नौदलाच्या युद्धनौका, एअरक्राफ्ट या अरबी समुद्रात शोधकार्य घेत असून; ग्रीन शिप सागर भूषण व सपोर्ट स्टेशन-3 या दोघांना टग बोटी द्वारे मुंबई बंदरात आणण्यात आले आहे. यापैकी सपोर्ट स्टेशन-3 यास इंदिरा डॉक या ठिकाणी ठेवण्यात आले असून, सागर भूषण या जहाजास मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ठिकाणी ठेवण्यात येत आहे.
11:58 May 21
23 मृतदेहांची ओळख पटली..
आतापर्यंत मिळालेल्या मृतदेहांपैकी २३ जणांची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे.
11:31 May 21
मृतदेह हस्तांतरित करणारा ड्यूटी ऑफिसर गैरहजर; नागरिकांमध्ये असंतोष..
तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्रात अडकलेल्या बार्ज पी-305 वरील 49 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित 38 जण बेपत्ता असल्याची माहिती नौदला कडून दिली जात आहे. बार्ज पी-305 वरील कर्मचाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबईतल्या येलो गेट पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केलेली आहे. आज सकाळपासूनच मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक जेजे रुग्णालयामध्ये पोहोचले आहे. परंतु जेजे रुग्णालयामध्ये येलो गेट पोलीस ठाण्यातील ड्युटी ऑफिसर मृतदेह हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेमध्ये उपस्थित नसल्यामुळे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांना मनस्ताप झेलावा लागत आहे. त्यामुळे यलो गेट पोलीस स्थानकाच्या विरोधात नातेवाईकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
09:23 May 21
'बार्ज पी305'च्या कॅप्टनवर गुन्हा दाखल..
मुंबईच्या चक्रीवादळादरम्यान अरबी समुद्रात बार्ज पी-३०५ बुडाल्या प्रकरणी, कॅप्टन राकेश बल्लव यांच्या विरोधात यलोगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बार्जवरील अभियंते मुस्तफिर रेहमान हुसेन शेख यांनी केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चक्रीवादळाची सूचना असतानाही, कॅप्टन राकेश बल्लव यांनी बार्ज वेळीच न हलवता, इतर कर्मचाऱ्यांच्या जीव धोक्यात घातला. यानंतर बार्ज बुडून काही कर्मचारी जखमी झाले, तर काहींचा मृत्यू झाला. या सर्व दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
09:10 May 21
आतापर्यंत ४९ मृतदेह मिळाले; २६ जणांचा शोध सुरुच..
मुंबई -तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्या 'पी 305 बार्ज'वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून सुरू आहेत. आतापर्यंत 188 कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत 49 कर्मचाऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सध्या बेपत्ता असलेल्या ३८ लोकांचा शोध सुरू आहे.
188 कर्मचाऱ्यांची सुटका
तौक्ते चक्रीवादळाच्या विळख्यात अडकलेल्या पी-305 या बार्जवरील कर्मचाऱ्यांच्या बचावकार्यासाठी भारतीय नौदलाच्या बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी 'आयएनएस कोची' आणि 'आयएनएस कोलकाता' यांच्यासोबत मिळून बचावकार्यास सुरुवात केली. याबरोबरच नौदलाच्या हेलिकॉप्टरचीसुद्धा या बचावकार्यात मदत घेतली. 17 मे रोजी सुरू झालेली ही मोहीम अद्यापही सुरू असून, आतापर्यंत 188 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.