मुंबई- मुंबईत आलेल्या तौक्ते वादळादरम्यान ओएनजीसीच्या पी ३०५ या बार्जवर कर्मचारी अडकून पडले होते. त्यामधील सुमारे १८८ जणांची सुटका करण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही २६ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. नेव्हीचे शोधकार्य अद्यापही सुरू आहे. सध्या भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे रुग्णालयाच्या शवगृहात ५० मृतदेह ठेवण्यात आले आहेत. हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना तपास करणारे यलो गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी आले नसल्याने शवविच्छेदन झाले नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केल्यावर पोलीस अधिकारी उपस्थित झाल्यावर ४४ मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. एकूण मृतांपैकी २३ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.
२३ जणांची ओळख पटवण्यात यश
मुंबईत सोमवारी १७ मे रोजी तौक्ते वादळ आले होते. या वादळादरम्यान समुद्रात ओएनजीसीसाठी काम करणारे २५० हून अधिक कर्मचारी पी ३०५ या बार्जवर काम करत होते. वादळ येणार असल्याने बार्ज किनाऱ्यावर नेण्याचे आदेश कॅप्टनला देण्यात आले होते. मात्र बार्ज किनाऱ्यावर न नेता त्याच ठिकाणी ठेवल्याने वादळात हे सर्व कर्मचारी अडकले. पाणी शिरल्याने बार्ज बुडू लागताच सर्वांनी समुद्राच्या पाण्यात उड्या मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. नेव्हीने यापैकी १८८ हून अधिक कर्मचाऱ्यांना वाचवले.
नातेवाईकांना राहावे लागले ताटकळत
बार्जवरील कर्मचाऱ्यांचे बचाव कार्य मंगळवारपासून सुरू आहे. जे मृतदेह मिळत आहेत ते जेजे रुग्णालयाच्या शवगृहात पाठवले जात आहेत. गेले दोन ते तीन दिवस मृतदेह शवगृहात आहेत. एकाच कर्मचाऱ्याचा मृतदेह गुरुवारी ताब्यात देण्यात आला आहे. इतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आज नातेवाईक रुग्णालयात आले होते. तेथे त्यांना तपास करणारे यलो गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी आले नसल्याचे समजले. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना त्या ताटकळत राहावे लागल्याने नातेवाईकांमध्ये पोलिसांविरोधात असंतोष निर्माण झाला होता. अधिकारी उपस्थित राहावे यासाठी यलो गेट पोलीस ठाण्यात शिष्टमंडळ घेऊन जाण्याचा निर्णयही नातेवाईकांनी घेतला होता.