मुंबई - राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकवर काढले आहे. नागरिकांनी जबाबदारीने वागावे, कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करावे आणि कोरोनाचा प्रसार रोखावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच येत्या आठ दिवसांत रुग्ण संख्या आटोक्यात न आल्यास लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. रविवारी राज्यातील जनतेशी त्यांनी संवाद साधला. सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक मिरवणुका मोर्चे, यात्रांवर बंदी घालण्यात आल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
मास्क हीच करोनाच्या लढाईतली ढाल-
राज्यात आटोक्यात आलेला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मुंबई, पुण्यासह, विदर्भात अमरावती, यवतमाळ, अचलपूर, अकोला शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहेत. राज्यात रविवारी ६९७१ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत देखील रुग्णसंख्या ३०० वरुन ९२१ वर पोहचली आहे. दिवसागणिक वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेचे लक्ष वेधले. गेल्या वेळी औषधांचा पुरवठा, व्हेंटिलेटर, ऑक्सीजनचा तुटवडा होता. सध्या पुरेशा प्रमाणात यंत्रणा सज्ज आहेत. टेस्टींग लॅब वाढल्या आहेत. लसीकरण सुरु झाले आहे. आतापर्यंत नऊ लाखांच्या आसपास लसीकरण झाले आहे. या लसींचे कोणतेही दृष्यपरिणाम दिसून आलेले नाहीत. पुढील दोन महिन्यांत आणखी एक-दोन कंपन्या आपल्याला लस पुरवठा करणार आहेत. त्यामुळे लवकरच सर्व सामान्य नागरिकांना लस मिळणार आहे. मात्र, मास्क हीच आपली करोनाच्या लढाईतली ढाल आहे. लस घेण्याअगोदर आणि नंतर देखील मास्क घालणे अनिवार्य असून शिस्त पाळणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. तसेच संसर्गाची साखळी तोडायची असेल तर संपर्क टाळा. त्रिसूत्रीची अंमलबजावणी करा, अन्यथा नियम मोडणाऱ्यांवार कडक कारवाई करणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
लॉकडाऊनचा निर्णय जनतेच्या हातात-
पुढचे आठ दिवस मी तुम्हाला देत आहे. तुम्ही कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन करा. लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णपणे तुमच्या हातात आहे, असे मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले. लॉकडाऊनसंदर्भात येत्या आठ दिवसांत आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.
सभा, समारंभांवर बंदी-
कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता काही प्रतिबंधात्मक नियमांचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सर्व शासकीय कार्यक्रम आता ऑनलाईन होतील असेही ते म्हणाले. तसेच राज्यात सर्वच राजकीय सामाजिक, धार्मिक अशा सार्वजनिक कार्यक्रमावर बंधने घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. आंदोलनांवरही यावेळी बंदी घालण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी सरकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
'मी जबाबदार' ही नवी मोहीम-