मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांदीवाल आयोगासमोर ( Chandiwal Commision ) अँटिलिया स्फोटकं प्रकरणात ( Antilia Blast Case ) एटीएसने दाखल केलेल्या अहवाल रेकॉर्डवर घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार चांदीवाल आयोगासमोर हा ( ATS Report On Antilia Blast Case ) अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये अँटिलिया समोर स्कॉर्पिओ सापडल्यानंतर बॉम्ब शोध आणि निकामी पथकाकडून या वाहनाची तपास करताना सचिन वाझे या तपासात अडथळा निर्माण करत असल्याचे धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
अहवालात काय लिहीलं आहे? -
उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ वर्षभर अगोदर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसच्या अहवालातून महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. यामुळे निलंबित पोलीस अधिकारी आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेंचा पाय आणखी खोलामध्ये गेला आहे. स्फोटकांनी भरलेली कार अंबानींच्या निवासस्थान बाहेर आढळून आल्याचे समजताच वाझेंनी काय केले आहे, याची धक्कादायक माहिती अहवालामध्ये मिळाली आहे.
अँटिलिया समोर स्कॉर्पिओ सापडली असताना बॉम्ब शोध करत असताना गाडीचा दरवाजा खोलताच त्यातून एक चिठ्ठी मिळाली. ज्यामध्ये अंबानी कुटुंबियांना धमकावणारा मजकूर लिहिण्यात आला होता. याबद्दल आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कळवले. तसेच लगेचच नागरिकांना गाडीपासून दूर होण्यास सांगितले. त्यानंतर त्यात जिलिटिनच्या काड्या मिळाले. यानंतर बॉम्ब शोधक पथकातील व्यक्ती तपास करत असतानाही वारंवार वाझे गाडीजवळ जाऊन स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात टाकत होते. त्यामुळे आम्ही त्यांना असे करु नका असे बजावले.
महाराष्ट्र एटीएसच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा आम्हाला संबंधित वाहनापबद्दल माहिती समजली आणि आम्ही त्याचा तपास करत होतो, तेव्हा 3 वाजून 50 मिनिटांनी आम्ही तिथे पोहोचलो. ज्यानंतर 9 वाजेपर्यंत आम्ही तपासणी केली. पण आमच्या पोहोचण्याआधीच सचिन वाझे त्याठिकाणी पोहोचले होते. तसेच आमच्या तपासांत वारंवार हस्तक्षेप करत होते.