मुंबई - उद्यापासून होणाऱ्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारला राज्यपालांनी आपले बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासोबतच उद्या विधानसभा अध्यक्षाची देखील निवडणूक पार पडणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून राहुल नार्वेकर तर, महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना पक्षाने ठरवून दिलेल्या उमेदवाराला मतदान करावे यासाठीच व्हीप जारी करण्यात आले आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी करण्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. महाविकास आघाडीचे विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत उमेदवार राजन साळवी यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
व्हिप म्हणजे काय?एखाद्या पक्षाने कोणत्या मुद्द्यावर सभागृहामध्ये भूमिका घ्यायची याबद्दल घेतलेला निर्णय म्हणजेच व्हिप होय. संसदीय लोकशाहीत पक्षातर्फे प्रतिनिधिंना व्हिप जारी केला जातो.पक्षाचा आदेश सर्व आमदारांना बंधनकारक असतो. हा व्हीप राजकीय पक्षाचा अधिकार असतो. विधिमंडळात आमदारांना पक्षादेश पाळणे हाच व्हीपचा मुख्य हेतू असतो. विधानसभेत महत्त्वाच्या विषयावर मतदानासाठी संबंधित पक्षाने कोणाला मतदान करायचे याचा निर्णय घ्याचा असेल, तर याबाबद पक्षादेश व्हीपमार्फत जारी करण्यात येतो. तसेच पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पक्ष असे वेळेवेळी व्हीप जारी करतात.