महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू; कर्नाटकातील राजकीय स्थितीवरुन अशोक चव्हाणांची टीका

केंद्र सरकार आणि इतर भाजपशासित राज्यातील यंत्रणांचा सर्रास गैरवापर सुरू असून भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

अशोक चव्हाण

By

Published : Jul 7, 2019, 9:50 PM IST

मुंबई -कर्नाटकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहे. यासाठी केंद्र सरकार आणि इतर भाजपशासीत राज्यातील यंत्रणांचा सर्रास गैरवापर सुरू असून भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

हुकुमशाही मानसिकतेच्या भाजप नेत्यांचा विरोधी पक्षाचे सरकार चालू न देणे हा एकमेव अजेंडा आहे. याकरिता ते साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर आणि सरकारी यंत्रणांचा राजरोस गैरवापर करत आहेत. गोवा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्येदेखील हीच निती वापरुन भाजपने सत्ता मिळवली. आता पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये तेच करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे, असे चव्हाण म्हणाले.

केंद्र सरकारबरोबरच कर्नाटक सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील फडणवीस सरकारही प्रयत्न करत आहे. राज्यातील प्रमुख मंत्री जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी कर्नाटक सरकार पाडण्याच्या कामात व्यस्त आहेत. भाजपच्या नेत्यांकडून काँग्रेसच्या आमदारांना खासगी विमानाने मुंबईत आणून आणि पंचतारांकित हॉटेलात त्यांची बडदास्त ठेवली जात आहे. देशातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या पक्षाकडून पैशाची अमिषे दाखवून तसेच सत्तेचा गैरवापर करुन दबाव टाकला जात आहे. ही लोकशाहीची विटंबना असून अत्यंत किळसवाणा प्रकार आहे. या प्रकाराच्या तीव्र शब्दांत टीका करत चव्हाणांनी भाजपच्या काळात लोकशाही धोक्यात आल्याचे म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details