मुंबई -मुंबईत दरवर्षी मार्च महिन्यात नालेसफाईच्या (Mumbai Sewage Cleaning ) कामांना सुरुवात होते. यावेळी अद्याप कंत्राटच मंजूर झालेले नाही. त्यामुळे आता जरी कंत्राटांना मंजुरी दिली, तरी 15 एप्रिलनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. त्यामुळे 375 किलोमीटरचे नाले अवघ्या दिड महिन्यात कसे साफ होणार? त्यामुळे तातडीने कामांना मंजुरी द्या, अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार ( Adv. Ashish Shelar ) यांनी पालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंग चहल ( Iqbal Singh Chahal ) यांच्याकडे केली आहे. मुंबईकरांना वाऱ्यावर सोडून सत्ताधारी फरार, अशी टीका शेलार ( Ashish Shelar Critisized Shivsena ) यांनी केली.
काय म्हणाले आशिष शेलार? -भाजपाच्या स्थापनादिना निमित्ताने ६ एप्रिल ते १४ एप्रिल हा सेवा सप्ताह साजरा केला जाणार असून या निमित्ताने मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी व देखरेख केली जाणार असल्याचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी नुकतेच जाहीर केले आहे. मात्र, अद्याप कंत्राटदारच नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तातडीने काल शेलार यांनी पालिका आयुक्तांची मुख्यालयात जाऊन भेट घेतली व नियमानुसार पारदर्शक पध्दतीने कंत्राटदार नियुक्ती करुन तत्काळ कामांना सुरुवात करावी, अशी मागणी केली. यावेळी मुंबईतील नालेसफाईच्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. दरवर्षी ही सुरुवात मार्च महिन्यात होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने निविदा काढून ७ मार्चला स्थायी समितीत १६० कोटींचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला होता. पण सत्ताधाऱ्यांनी तो राखून ठेवला. त्यानंतर पालिकेची मुदत संपली आणि प्रशासकांची नियुक्ती झाली. एवढा उशिरा सुरुवात करुन कामे कशी पूर्ण होणार, जर कामे वेळेत पूर्ण झाली नाही तर मुंबईकरांना यावेळी पावसाळ्यात भयाण परिस्थितीला सामोरे जावे लागेल, अशी भिती शेलार यांनी व्यक्त केली.