मुंबई -एमआयएम ( AIMIM ) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी ( Asaduddin Owaisi ) यांनी राज्यातील मुस्लिमांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी चांदिवली येथे तिरंगा रॅली काढत सभेचे आयोजन केले होते. मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. यवरुन ओवैसी यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसचे राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या मुंबई दौऱ्यावेळीही हे ठाकरे सरकार कलम 144 लावणार का, असा सवाल उपस्थित केला. पुढे म्हणाले, राहुल गांधी येतील तेव्हा ओमायक्रॉनची ( Omicron ) चर्चा होणार नाही. केवळ सत्तेची चर्चा होईल. आमच्या रॅलीवेळी मात्र ओमायक्रॉनची चर्चा होते व कलम 144 लागू होते, अशी टीका ओवेसी यांनी केली.
राज्यात केवळ 4.9 टक्के मुस्लिम पदवीधर
मुस्लिमांनी राजकीय धर्मनिरपेक्षतेपासून सांभाळून रहावे. अनेक जण निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचा मुद्दे उचलतात. निवडून येतात आणि आपली राजकीय पोळी भाजतात. सध्या राज्यात केवळ 4.9 टक्के मुस्लीम पदवीधर आहेत. नोकरीमध्ये आरक्षण नाही, शिक्षणामध्ये आरक्षण नाही. यामुळे राज्यातील मुस्लिम शैक्षणीक व आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, असे ओवैसी यांनी सांगितले.