मुंबई -क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये गेल्या 25 दिवसांपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आर्थर रोड तुरंगात अटकेत होता. ऑर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली असून तो मन्नत कडे रवाना झाला आहे. दरम्यान, काल आर्यन खानची जामीनदार म्हणून अभिनेत्री जुही चावला सेशन कोर्टात पोचली होती. मात्र, कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने आर्यनला कालची रात्र तरुंगात काढावी लागली.
म्हणून आर्यनचा तुरुंगातील मुक्काम वाढला -
आर्यनच्या जामीनासाठी अभिनेत्री जुही चावला जामीनदार म्हणून सेशन कोर्टात शुक्रवारी संध्याकाळी जवळपास साडेचार वाजेच्या सुमारास दाखल झाली. यावेळी आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे देखील कोर्टात आले होते. त्यांनी कोर्टात न्यायाधीशांकडे जामीनाचे कागदपत्रे सादर केले. तसेच जुही चावला जामीनदार म्हणून कोर्टात हजर झाली. यावेळी कोर्टात जुहीचे आधारकार्ड आणि पासपोर्ट सादर करण्यात आले. जुहीने औपचारिकपणे आपला परिचय कोर्टात दिला. पण जुहीचा एक पासपोर्ट फोटो कमी पडल्याने जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास उशिर झाला. नियमानुसार जामीनासाठी जामीनदाराचे दोन फोटो जरुरीचे असतात. पण दोन फोटो नसल्याने या प्रक्रियेला उशिर झाला. यावेळी कोर्टाने वकिलांना फटकारले. जामीनाची सर्व प्रक्रिया माहिती असताना जामीनदारांना त्याबाबत आधी माहिती देणे अपेक्षित होते, असे न्यायाधीशांनी वकिलांना सुनावले. त्यानंतर जुहीचे आणखी एक पासपोर्ट साईज फोटो मागविण्यात आला. मात्र, वेळ झाल्याने आर्यनला कालची रात्र तुरुंगात काढावी लागली.