मुंबई -शिवसेनेचे मराठवाड्यातील नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर हे 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत आहेत. शनिवारी खोतकर शिंदे गटात जाणार की शिवसेनेत राहणार?, याबाबतची भूमिका जाहीर करणार ( Arjun Khotkar Join Shinde Group ) आहेत. त्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलून निर्णय घेणार असल्याचं अर्जुन खोतकरांनी स्पष्ट केलं आहे. त्यातच आता शिवसेना नेत्यांचा जालना दौरा होणार आहे. मात्र, या दौऱ्यातून अर्जुन खोतकरांचे नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे खोतकर बंडाच्या तयारीत असताना शिवसेना सक्रिय झाली असल्याचं दिसत ( Shivsena Meeting In Jalna District ) आहे.
'दबाव असताना मी कोणता निर्णय घेईन' -अर्जुन खोतकर मागील आठ दिवसांपासून दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अन्य खासदारांच्या सतत ते संपर्कात आहेत. शिवसेनेच्या इतर नेत्यांप्रमाणे खोतकरांवरही ईडी किंवा इतर तपास यंत्रणांचा दबाव असल्याचं बोललं जात आहे. खुद्ध खोतकरांनी सुद्ध माझ्यावर आणि कुटुंबावर दबाव असल्याचं माध्यमांसमोर सांगितलं आहे. असा दबाव असताना मी कोणता निर्णय घेईन, हे तुम्हीच सांगा.. असे खोतकर म्हणाले. मात्र, अद्याप त्यांनी ठोस निर्णय जाहीर केलेला नाही. पण, त्यांच बंड लक्षात घेता शिवसेना सक्रिय झाली आहे. जालन्याचे संपर्कप्रमुख आणि उपनेते विनोद घोसाळकर हे जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. तसेच, त्यांच्या दौऱ्याच्या पत्रिकेतून अर्जुन खोतकरांचं नावही गायब करण्यात आलं आहे.