मुंबई- मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रविवारी (दि. 2 जानेवारी) ठाकरे कुटुंबीयांची सून व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्याअंकिता पाटील ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली ( Ankita Patil Thackeray Corona Positive ) आहे. अंकिता यांनी समाज माध्यमावरून याबाबत माहिती दिली.
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख वाढतो आहे. दुसरीकडे ओमायक्रॉन ( Omicron Variant ) विषाणूचा प्रसार वेगाने होतो आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील दहा मंत्री विषाणूबाधित आहेत. अंकिता पाटील व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे हे दोघे 28 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये थाटामाटात त्यांचा विवाह झाला होता. यानंतर हर्षवर्धन पाटील कोरोनाबाधित आढळून आले होते. आज हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता यांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.