मुंबई -अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके (Ramesh Latake) यांचे निधन झाल्याने पोट निवडणूक होत (Andheri Bypoll 2022) आहे. त्यांच्या जागी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र लटके या महापालिका कर्मचारी असून त्यांचा राजीनामा पालिकेने मंजूर केलेला नाही. यामुळे त्या उमेदवारी अर्ज भरू शकत नसल्याने उद्धव ठाकरे गटापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. यासाठी पालिकेने लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, लटके यांचा राजीनामा मंजूर होऊ नये म्हणून मुख्यमंत्री दबाव टाकत असल्याचा आरोप केला जात आहे.
उद्धव ठाकरे गटापुढे पेच -अंधेरी पूर्व येथून शिवसेनेकडून रमेश लटके हे २०१९ मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. काही महिन्यापूर्वी लटके यांचा मृत्यू झाला. यामुळे अंधेरी येथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत अंधेरी येथील के ईस्ट उपायुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या अखत्यारीत नोकरी करत होत्या. त्यांनी महिनाभरापूर्वी नोकरीचा राजीनामा दिला आहे. मात्र पालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. लटके यांचा राजीनामा मंजूर होत नाही, तोवर त्यांना निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. यामुळे लटके यांचा राजीनामा लवकर मंजूर करावा यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या जात आहेत. लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही तर उद्धव ठाकरे गटापुढे मोठा पेच निर्माण होणार आहे.