मुंबई - घटस्थापनेच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून लोकलमध्ये सर्व महिलांना प्रवास करू देण्याची मुभा दिली आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी अगोदर सांगितले होते की, राज्य सरकारने आम्हाला सूचना दिल्या तर रेल्वे टप्याटप्याने सर्वांसाठी सुरू करू त्याप्रमाणे, राज्य शासनाच्या सुचनेने आता महिलांसाठी लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे.
हेही वाचा -पाकिस्तानच्या अकमलची भरारी, 'या' विक्रमात धोनीला टाकले मागे
सकाळी ११ ते दुपारी 3 या वेळेत आणि पुन्हा संध्याकाळी 7 पासून ते शेवटची लोकल असेपर्यंत सर्व महिलांना लोकल सेवा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी विनंती रेल्वे प्रशासनाला महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने पत्रव्यवहार करून केली होती. त्यानुसार आता उद्यापासून मुंबई आणि एमएमआर विभागातील वैध तिकिट असलेल्या सर्व महिलांना तसेच सर्व आपत्कालीन कर्मचार्यांनाही लोकलमध्ये प्रवेशास परवानगी असेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
हेही वाचा -पंढरपुरात पूरपरिस्थिती, 8 हजार कुटुंबांना हलवले सुरक्षितस्थळी
महिलांसाठी रेल्वे प्रवासात क्यूआर कोडची आवश्यकता नाही, परंतु योग्य ती खबरदारी घेत लोकलने महिलांनी प्रवास करावा, अशा सूचना रेल्वे प्रशासनाने केल्या आहेत. तसेच आपत्कालीन सेवा म्हणून आजपर्यंत सूचित केलेल्या सर्व क्षेत्रातील कर्मचार्यांना स्थानिक रेल्वे सेवा सध्या चालू ठेवल्या जातील. तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या मागणीनुसार लोकल गाड्यांची वारंवारता देखील वाढवणार आहे, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.