मुंबई - जगभरामध्ये दहशत पसरवणारा कोरोना व्हायरस महाराष्ट्रमध्ये देखील दाखल झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत १७ रुग्ण हे कोरोनाग्रस्त असल्याची माहिती सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवारी शासनाकडून कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी व संसर्ग रोखण्यासाठी चित्रपट गृहे, नाट्यगृहे, शाळा, व्यायामशाळा, महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन हे कार्यक्रम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची विधानभवन मुंबई येथे भेट घेतली.
हेही वाचा...कोरोना खबरदारी : मध्यरात्रीपासून 'या' शहरातील चित्रपटगृहे, जिम्स, नाट्यगृहे बंद
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन ही चित्रपट, मालिका क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी महत्वपूर्ण संघटना मानली जाते. सध्या चित्रपट, नाटकांच्या क्षेत्रातही कलाकार, कर्मचारी यांना कोरोना व्हायरसची धडकी भरली आहे. चित्रपट निर्मित्या कंपनीकडून आणि तेथील प्रशासनाकडून कोरोना रोगा संदर्भात कोणतीही काळजी घेतली जात नसल्याची तक्रार ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनकडून करण्यात आली.
चित्रपट, नाटक चित्रीकरण ज्या ठिकाणी होते तिथे किमान दीडशे ते दोनशेहून जास्त कलाकार व कर्मचारी असतात. हजारो प्रेक्षक वर्ग चित्रीकरण पाहण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी राज्यात आणि विशेषतः मुंबई मध्ये ज्या ठिकाणी चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. ते तत्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री याच्याशी चर्चा करून पुढील आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिले. यावेळी ऑल इंडियन सिने वर्कर्सचे अध्यक्ष सुरेश गुप्ता, सरचिटणीस प्रसाद खामकर, राज्य उपाध्यक्ष गणेश शेगर उपस्थित होते.