मुंबई -महाविकास आघाडीची चर्चा संपतच नव्हती, मात्र राज्याला स्थिर सरकारची आवश्यकता होती. दोघेजण एकत्र आल्याचे कधीही चांगलेच म्हणून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दिली आहे.
राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी मोठी घटना आज (शनिवारी) घडली. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात हा शपथविधी पार पडला.
आज (शनिवारी) सकाळी राजभवनावर अनपेक्षितरित्या झालेल्या या शपथविधीनंतर, नविन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. २४ तारखेपासून राज्यात कोणीही सरकार बनवू शकले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार येत असेल तर रस्ता काढणे आवश्यक होते. यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि आम्ही सरकार स्थापन केले, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
अजित पवार यांची प्रतिक्रिया ;
- राज्यात दोघेजण एकत्र आल्याचे कधीही चांगलेच म्हणून भाजपच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला
- महाविकास आघाडीची चर्चा संपतच नव्हती, तिघे एकत्र येताना अडचणी वाढत होत्या, त्यामुळे हा निर्णय घेतला
- राज्याला स्थिर सरकारची आवश्यकता होती, ते स्थिर सरकार आणण्यासाठी आम्ही दोघे एकत्र आलो आहोत.