मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल बुधवार(दि. 6 एप्रिल)रोजी दिल्लीत भेट झाली. ही भेट नेमकी का झाली? याबाबत खुद्द शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. मात्र, तरीही काही लोक या भेटीच्या बाबतीत चुकीची माहिती पसरवत आहेत अस मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
चर्चेची सर्व माहिती कोणीही सांगत नाही - पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान शरद पवार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा विषय काढला. परंतु, पक्षातील मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत शरद पवार यांनी कोणतीही चर्चा पंतप्रधानांची केली नाही. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या चर्चेला अजित पवार यांनी पूर्णविराम देत भेटीत झालेल्या चर्चेची सर्व माहिती कोणीही सांगत नाही. मात्र, या भेटी दरम्यान जे महत्त्वाचे विषय होते त्या सर्व विषयांवर शरद पवार यांनी पंतप्रधानांशी चर्चा केल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे.
मेट्रो कार शेडबाबत केंद्र सरकारशी चर्चा करण्यास तयार -केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वादामुळे मेट्रो कार शेड अद्यापही उभा राहू शकलेले नाही. या वादामुळे सामान्य जनतेचे नुकसान होत असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले असून, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी चर्चा करून यामधून मार्ग काढावा आणि कांजूरमार्ग येथील मेट्रो कार शेड प्रकरण सोडवावे अशा सूचना केल्या आहेत. न्यायालयाच्या या सूचनेनंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारसोबत राज्य सरकार या मुद्द्यावर चर्चा करायला केव्हाही तयार असल्याचे म्हणाले आहेत.
न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय सर्वांना बांधील -एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर कर्मचारी अद्यापही संपावर आहे. परिवहन मंत्री यांनी 31 मार्च पर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिले होतं मात्र 5 एप्रिल ला कोर्टात यासंबंधी सुनावणी असल्याने त्यादिवशी पर्यंतचा अल्टिमेटम काही कर्मचाऱ्यांना वाटत होता. आता कोर्टानेही कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे. न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय हा सर्वांनाच बांधील असतो असे आवाहन अर्थमंत्र्यांनी यावेळी केले.
हेही वाचा -Raut On Fadnavis : त्यांचा जीव तीळ-तीळ तुटला असेल! राऊतांची फडणवीसांवर टीका