मुंबई - मुंबईत एकूण १९४१.१६ किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यात शहर विभागात ५०६.४६ किलोमीटर, पश्चिम उपनगरात ९२०.६४ किलोमीटर व पूर्व उपनगरात ५०७.०६ किलोमीटरच्या रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांवर असलेली वाहतुकीची वर्दळ, सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून सातत्याने खोदण्यात येणारे चर, जलवाहिन्यांची गळती, पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे यामुळे रस्त्यांची दुरावस्था होते. मुंबईमध्ये बहुतेक ठिकाणी मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे. यामुळे रस्त्यांच्या कामावर परिणाम होत आहे. असे असले तरी इतर ठिकाणी पालिकेने सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यास सुरुवात केली आहे. केबल आणि पाण्याच्या पाईपलाईन आदी सेवा देण्यासाठी रस्त्यांच्या बाजूला डक ठेवले जात आहेत. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्त्यांची पाहणी केली. या दरम्यान रस्त्यावर खड्डे दिसायला नकोत अशा स्पष्ट सूचना पालिकेला दिल्या आहेत. यावेळी पालिकेकडून रस्ते काँक्रीटचे केले जात असून येत्या दोन वर्षात सर्व रस्ते काँक्रीटचे केले जातील अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती.
रस्त्यांसाठी ५८०० कोटींची टेंडर - आतापर्यंत पालिकेने २०२१-२२ मध्ये १९६ किमीचे रस्ते पूर्ण केले आहेत. त्यात, सीमेंट काँक्रीटचे रस्ते १६३.५७ किमी असून ३२.७७ किमी रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. २०२२-२३ मध्ये रस्त्याच्या काँक्रीटकरणाच्या कामासाठी पालिकेने ५ टेंडर काढली आहेत. ५८०० कोटींची ही टेंडर आहेत. ८०० ते १९०० कोटींची ही टेंडर आहेत. पालिकेच्या कामात मोठ्या कंपन्या सहभागी होत नव्हत्या. यासाठी नियमात बदल करण्यात आले आहेत. यामुळे मोठ्या कंपन्या सहभागी झाल्याने नागरिकांना दर्जेदार रस्ते मिळतील असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. पालिकेने ९८९ किलोमिटर रस्ते काँक्रीटचे केले आहेत. सध्या २३६ किलोमीटरचे काम केले जाणार आहे. आणखी ४०० किलोमीटरचे काम केले जाणार आहे. मुंबईत गेल्या २० वर्षात २१ हजार कोटी रुपये खर्च करुन रस्ते तयार केले आहेत.