मुंबई - मुंबई महानगरपालिकेने सन २०२२-२३ चा ( BMC Budget 2022 ) ४५ हजार ९०० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. स्थायी समितीमध्ये हा अर्थसंकल्प मंजूर करताना त्यात 650 कोटी रुपयांचा फेरफार करण्यात आला होता. त्या फेरफाराला भाजपाने आक्षेप घेत पालिका आयुक्तांना पत्र दिले ( Commissioner Iqbal Singh Chahal ) होते. त्यानंतर आयुक्तांनी हा फेरफार रद्द केल्याचे ( Canceled 650 Crore Bmc Budget ) भाजपाचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.
अयोग्य फेरफार रद्द झाला
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात ६५० कोटींचा फेरफार होणार, अशी घोषणा स्थायी समिती अध्यक्षांनी केली होती. त्याला भाजपाने तीव्र विरोध केला होता. आता नवीन प्रभाग रचना होत असून, निवडणुकीनंतर नवीन नगरसेवक येणार आहेत. त्यामुळे या नगरसेवकांच्या प्रभागात काय फेरफार करावा? निधीमध्ये काय वाढ करावी? हा निर्णय नवीन सभागृहाने घेतला पाहिजे. सध्याच्या सभागृहाने हा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे हा ६५० कोटींचा फेरफार रद्द करावा, असे लेखी पत्र भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि महापालिका आयुक्तांना लिहिले होते.
या पत्राची दखल घेत पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी स्थायी समितीत होणारा ६५० कोटींचा फेरफार रद्द केला. हा भाजपाच्या पत्राचा परिणाम आहे की, 'आयकर धाडीचा?', असा उपरोधिक टोला स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी लगावत अयोग्य फेरफार रद्द झाला हे अधिक महत्त्वाचे आहे, अशी बोचरी टीका केली आहे.