मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता नाट्याचा ( Political crisis in Maharastra ) आजचा सहावा दिवस. आमदार फुटल्यापासून सुरू झालेला शिवसेनेचा बैठकांचा सिलसिला आजदेखील सुरू होता. कधी नव्हे ते आदित्य ठाकरे पक्ष संघटना वाढवण्यासाठी आता मुंबईत जागोजागी मेळावे, सभा घेत आहेत. या मेळावे, बैठकांमध्ये आदित्य ठाकरे सध्या बंडखोर आमदारांवर धक्कादायक आरोप करीत असून, "20 मे रोजीच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर" दिल्याचा ( Eknath Shinde Offered CM Post ) धक्कादायक खुलासा आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी केला आहे. ते शिवसेना भवन येथे झालेल्या युवा सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.
20 मे रोजीच शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर :यावेळी बोलताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, "20 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. त्यांनी एकनाथ शिंदेंना वर्षावर बोलवून घेतलं आणि त्यांच्या नाराजीबाबत विचारणा केली होती. मुख्यमंत्रीपद हवयं का? व्हायचं असेल तर या घ्या चाव्या... असं स्पष्ट सांगितलं होतं. असे असतानाही एकनाथ शिंदे यांनी २० जून रोजी बंड केला. मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असता एकनाथ शिंदे यांनी टाळाटाळ केली." असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
शिंदे गटाचे 20 आमदार संपर्कात :इतकंच नाही तर, शिंदे गटाचे १५-१६ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, "एकनाथ शिंदेंच्या बंडखोर गटात आता फूट पडली आहे. शिंदे गटातील एक गट सातत्याने उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असतो. शिंदे गटाचे २० आमदार सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असतात. यातल्या काही जणांना पुन्हा पक्षात घेण्याचा विचार केला जाऊ शकतो." असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.