मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच आरे कॉलनी जंगल नसल्याचा निर्वाळा दिला होता; तर दुसरीकडे 'आरे'त मेट्रो कारशेड उभारल्यास स्थानिक जैवविविधता धोक्यात येणार असल्याने 'आरे'ला जंगल घोषित करावे, अशी मागणी युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. यावरून शिवसेना व भाजपच्या भूमिका विरोधाभास निर्माण करणाऱ्या असल्याचे समोर आले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यापूर्वी जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला होता. त्यावेळी भाजपला माघार घ्यावी लागली होती. यावेळी आरे कॉलनीत कारशेड उभारणीला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. यामुळे दोनही पक्षांमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत.
हेही वाचा 'आरे'तच मेट्रोचे कारशेड करण्यावर पालिका आयुक्तही ठाम
मेट्रो प्राधिकरणाची मुंबईकरांवर मनमानी सुरू असून, मेट्रो प्राधिकरण म्हणजे पर्यावरण मंत्रालय आहे का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. कारशेडसाठी अन्य जागेचा पर्याय नसल्याचे सांगून मेट्रो प्राधिकरण मुंबईकरांना धमकावत आहे. यामुळे आरे कॉलनी व्यतिरिक्त इतर ठिकाणी काम करण्यास नकार देणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली करा, अशी मागणी त्यांनी केली.
आरेमध्ये कारशेड न झाल्यास मेट्रोचा प्रकल्प रखडेल, असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच पर्यायी जागा सुचवण्यासाठी सल्लागार समिती नेमली नसल्याची तक्रर त्यांनी केली. तसेच मुंबईबद्दल प्रेम असणाऱ्या अधिकाऱ्यांनाच मुख्यमंत्र्यांनी नेमावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा आरेतील वृक्षतोड रोखण्यासाठी भर पावसात आदिवासी नागरिकांची निदर्शने
आम्ही वायफाय हॉटस्पॉट देऊ असे सरकार सांगत आहे. परंतु, आरे कॉलनी नष्ट झाल्यास ऑक्सिजन स्पॉट तयार करावे लागतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले. काहीही झाले तरी आम्ही आरेला हात लावू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.