मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. आपल्याच मित्रपक्षांना वाचवण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीची मोठी धडपड सुरू आहे. त्यातच आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. अबू आझमी यांनी पत्रातून शिवसेनेच्या नवा हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केल्याने या निवडणुकीत शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे.
किमान समान कार्यक्रमांतर्गत एकत्र येण्याची आठवण :अबू आझमी यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की, "महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आता अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. जातीयवादी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी किमान समान कार्यक्रमांतर्गत महाविकास आघाडीचा पाया घातला गेला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी सर्व जाती-धर्मांना सोबत घेण्याच्या अटीवर शिवसेनेला पाठिंबा दिला. मात्र, अडीच वर्षे पूर्ण होऊनही सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही." असे आझमी यांनी म्हटले आहे.
पत्रात मांडल्या समस्या : अबू अझमींनी आपल्या पत्रात पुढे म्हटलंय की, "गेल्या अडीच वर्षांत तुम्हाला अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर अनेक पत्र लिहिली, त्यांच्या अनेक समस्या आपणापुढे मांडल्या. पण, तुम्ही एकदाही उत्तर दिले नाही. आघाडीचे सरकार धर्मनिरपेक्ष आहे की नाही हा प्रश्नच पडतो. आजकाल तुम्ही ज्या नव्या हिंदुत्वाविषयी बोलत आहात, तोच आघाडीचा चेहरा आहे का, असा प्रश्न आम्हाला पडतो. महाराष्ट्र सरकारने अडीच वर्षांत या प्रश्नांवर का कारवाई केली नाही, हे जनतेला समजावून सांगण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची आहे."