मुंबई -दिल्ली आणि पंजाबमधील मोफत वीज आणि पाण्याचे मॉडेल मुंबई महानगरपालिकेत आजमावण्याचा प्रयत्न आपने सुरू केला आहे. वीज मोफत देणे शक्य नसले तरी मुंबईकरांना पाणी आणि घरपट्टी तसेच अन्य सुविधा मोफत देता येऊ शकतील, असा दावा आपने केला आहे. मात्र, आपच्या या भूलथापांना मुंबईकर बळी पडणार नाही, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.
१७ मे मुंबई -मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये ( BMC Election ) सर्वच राजकीय पक्षांनी आपापली ताकद आणि अजेंडा राबवायला सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत फारसा प्रभाव टाकू न शकलेल्या आम आदमी पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी पेक्षा जास्त मते घेतली हे नक्की. आता सर्वच पक्षांचे सोन्याचे अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेकडे लक्ष लागले आहे. गेले पंचवीस वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा लागावा यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. आम आदमी पक्षानेही दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर मुंबईकर मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोफत पाणी आणि अन्य नागरी सुविधा मोफत देण्याबाबत विचार सुरू असून तशा पद्धतीचा दावा आपल्या जाहीरनाम्यात करणार असल्याचे सुतोवाच केले आहे.
मुंबईकरांना मोफत पाणी आणि नागरी सुविधा देणे शक्य - धनंजय शिंदे -मुंबई महानगरपालिकेकडे असलेली ठेव रक्कम आणि महानगरपालिकेचे एकूण बजेट पाहता मुंबईकरांना मोफत पाणी आणि अन्य नागरी सुविधा देणे शक्य आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अन्य महानगरपालिकांमध्येही नागरी सुविधा अत्यल्प दरात किंवा मोफत देण्याचा आम आदमी पक्ष प्रयत्न करणार आहे. त्या दृष्टीने आम्ही अभ्यास करत असून लवकरच त्याबाबत आमच्या जाहीरनाम्यामधून घोषणा करू, अशी प्रतिक्रिया आपचे महासचिव धनंजय शिंदे यांनी दिली आहे. ते म्हणाले, दिल्ली आणि पंजाब प्रमाणेच आरोग्य, शिक्षण, पाणी आणि वीज या चार मूलभूत गरजा अत्यल्प दरात किंवा मोफत देण्याचा आम्ही सर्वत्र प्रयत्न करणार आहोत. लोकांच्या दैनंदिन गरजा भागवल्या जाव्या यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे. जनता त्याला नक्कीच स्वीकारेल, असा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.