मुंबई- मुंबईत जर रखडलेले गृह प्रकल्प मार्गी लावायचे असतील तर गृहनिर्माण प्रकल्प राबवला पाहिजे. तसेच सरकारमार्फत गृहनिर्माण धोरण राबवण्यात आले पाहिजे, असे शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ते म्हाडा मुख्यालयात घेतलेल्या बैठकीदरम्यान बोलत होते.
अनेक गृहप्रकल्प हे रखडलेले आहेत. या प्रकरणी शुक्रवारी आदित्य ठाकरे यांनी म्हाडा कार्यालयात मुंबईतील शिवसेना आमदारांसोबत आणि म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी बीडीडी चाळ, म्हाडाच्या 56 वसाहती, गिरणी कामगार या विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच बीडीडी पुनर्विकासाचे प्रेझेंटेशनही यावेळी आदित्य यांना दाखवण्यात आले. यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री सचिन अहिर, शिवसेना आमदार अनिल परब उपस्थित होते.
गृहनिर्माण धोरण राबवले तर विकासाची गती वाढेल मी म्हाडा कार्यालयात पहिल्यांदा आलो आहे. मी अनेक ठिकाणी फिरलो तेव्हा त्या गृहनिर्माण संस्थेमध्ये अनेक समस्या असल्याचे मला दौरा करताना लक्षात आले. म्हणून सगळ्या मुंबईतल्या आमदार आणि सेनेच्या काही नेत्यांचीही बैठक बोलवली होती. वरळी आणि शिवडीतील बीडीडी चाळीतील लोकांना न्याय मिळायला हवा. चार वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले, नारळ फुटले पण अद्यापही काहीच झालं नसल्याचे त्यांनी म्हटले. लोक अजूनही ट्रांजिस्ट कॅम्पमध्ये गेलेले नाहीत. मी आता राजकीय वादात जाणार नाही. ४ वर्षात वेग आला नाही, लोकप्रतिनिधींच्या म्हणण्यानंतर आम्ही अधिकृत संस्थेत म्हणजेच म्हाडामध्ये आलो आहोत. आता सगळ्या आमदारांसह मुख्यमंत्र्यांची भेट आम्ही घेणार असून आज चर्चेत आलेले विषय त्यांच्यासमोर मांडणार आहोत. तसेच आमची 'आरे' संदर्भात भूमिका बदलली नाही. कांजूरमार्गला तो मेट्रो डेपो हलवता येऊ शकतो. तसेच झाडांची कत्तल होणार नाही याचीही काळजी घेण्यात येणार असल्याचेही आदित्य यांनी सांगितले.
राज ठाकरेंच्या विषयी -
उद्धव साहेब एखादी गोष्ट संदर्भात बोलतात तेव्हा ते विचार करून बोलतात. आम्ही त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे आदित्य यांनी सांगितले.