आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलेले आवाहन मुंबई -महाराष्ट्र राज्यच नव्हे तर संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी लढत आहे. यामुळे येत्या 13 जूनला माझा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे, असे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या संकटात सुरू असलेली जनसेवा अधिक प्रभावीपणे कार्यरत करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना विरोधातील लढ्यात कोरोनावर मात करणे हेच आपले एकमेव ध्येय आहे. त्यामुळे जिथे असाल तिथूनच मला शुभेच्छा, आशीर्वाद द्यावेत, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
शिवसैनिक व मित्रमंडळी या सर्वानी होर्डिंग, केक, हार, तुरे हा खर्च टाळून ती रक्कम कोरोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांवर खर्च करा किंवा मुख्यमंत्री सहायता निधीला द्या, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त हे एक सत्कार्य होईल आणि याचा मला निश्चित आनंद होईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
प्रशासनाच्या नियमांचे पालन करून आपण प्रशासनाला सहकार्य करूया. तुम्ही सर्वजण कोरोनापासून स्वतःची काळजी घ्या, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट असेल. आजपर्यंत आपण मला दिलेले प्रेम आणि आशीर्वाद यापुढे सुद्धा माझ्यासोबत राहील, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.