मुंबई- मुंबई महानगर पालिकेची मुदत ७ मार्चला संपत आहे. या पार्श्वभूमीवर २ मार्चला स्थायी समितीची सभा लावण्यात आली होती. मात्र या सभेत ५० टक्के प्रस्ताव राखून ठेवत सोमवारी ७ मार्चला शेवटच्या दिवशी सभा लावण्यात आली आहे. या सभेत साडेतीन हजार कोटीचे ३०० प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. यावरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
निधी वापराचा सपाटा -
मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपत आहे. पालिकेचा कारभार त्यानंतर प्रशासकाच्या हाती जाणार आहे. तत्पूर्वी पालिकेने विकासकामांसाठी तरतूद केलेल्या निधीचा वापर करण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सुमारे दोन हजार कोटींहून अधिक रकमेचे २०० प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यातील ५० टक्के म्हणजे ९७ प्रस्ताव राखून ठेवण्यात आले. गेल्या आठवड्यात शुक्रवारी झालेली बैठक शेवटची असल्याचा अंदाज केला जात होता. मात्र पालिकेची मुदत संपण्यास आणखी काही दिवसांचा अवधी मिळणार असल्याने ही संधी प्रशासनाने साधली आहे.
रुग्णालयासाठी ६७० कोटी -
पालिका विसर्जित होण्याच्या शेवटच्या दिवशी सात मार्चला स्थायी समितीची बैठक लावण्यात आली आहे. या बैठकीत मांडण्यात येणा-य़ा ३०० प्रस्तावांमध्ये नाहूर येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या रुग्णालयाचा सर्वाधिक तब्बल ६७० कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. यासह विविध रुग्णालये, जलाशय व बोगदा, रस्तेबांधणी, अग्निशमन दल, मलनि:स्सारण व अन्य विकासकामांचे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
कोट्यवधीचे प्रस्ताव -
- नाहूर रुग्णालय ६७० कोटी
- शताब्दी रुग्णालय, कांदिवली ४३२ कोटी
- नायर रुग्णालय २९६ कोटी
- पवई घाटकोपर जलाशय बोगदा ५१५ कोटी
- मलबार टेकडी जलाशय ५८९ कोटी
- अग्निशमन दल १२६ कोटी
- मलनि:स्सारण वाहिन्या ८० कोटी
- नाला संरक्षण भिंत २२ कोटी
- मानखुर्द लहान रस्ते २६ कोटी
- कुर्ला लहान रस्ते २५ कोटी
- दक्षिण मुंबई लहान रस्ते २३ कोटी
- अन्य विकासकामे ७०० कोटी