मुंबई - कोविड रुग्णांवर आता मुंबईतील चार मोठ्या कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यातील एक महत्वाचे सेंटर असलेल्या बीकेसी कोविड सेंटरमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन आठवड्यात येथे 91 मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर बीकेसी कोविड सेंटरमधील मृत्यूदर मुंबई महापालिकेच्या कोविड रुग्णालयापेक्षा अधिक आहे. त्यामुळे आता पालिकेने याची गंभीर दखल घेत यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सेंटरला दिले आहेत.
मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने बीकेसी सुमारे 2 हजार बेडचे कोविड सेंटर बांधण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये आयसीयू बेडही असून काही दिवसांपासून गंभीर रुग्णांवर ही उपचार येथे केले जात आहेत.
आतापर्यंत या सेंटरमधून शेकडो रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सेंटर सुरू झाल्यापासून येथे एकही रूग्ण दगावला नव्हता. मात्र गेल्या तीन आठवड्यापासून येथे कॊरोना रुग्णांचे मृत्यू होण्यास सुरुवात झाली असून हे मृत्यू काही कमी होताना दिसत नाहीत. आतापर्यंत (केवळ 3 आठवड्यात) येथे 91 मृत्यू झाल्याची माहिती कोविड सेंटरमधील एका डॉक्टरांनी दिली आहे.
याविषयी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ राजेश डेरे यांना विचारले असता त्यांनी तीन आठवड्यापूर्वी संपूर्ण सेंटरमध्ये एकही मृत्यू नव्हता. पण आता आयसीयू वॉर्डमध्ये मृत्यू होत असल्याचे सांगितले आहे. मात्र त्याचवेळी पालिकेने आरोग्य क्षेत्रातील एका खासगी कंपनीला आयसीयू वॉर्ड चालवण्यासाठी दिल्याचे म्हणत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना विचारणा केली असता त्यांनी बीकेसी कोविड सेंटरमध्ये मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे खासगी कंपनीकडून आणि संबंधित आमच्या अधिकाऱ्याकडून हे मृत्यू का होत आहेत, याची कारणे देत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.