मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत असतानाच ऑगस्टपासून पावसाळी आजारांनी मुंबईकरांना हैराण केले आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाळी आजारांमुळे एकही मृत्यू झाला नसला तरी पालिकेच्या २४ पैकी ३ वॉर्डमध्ये डेंग्यूच्या ८५ रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे पालिका सतर्क झाली असून मुंबईकरांनी मच्छर आणि डास यांच्या आळ्या होऊ नयेत यासाठी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे.
४ हजार १०८ स्थळे नष्ट -
मुंबईत सप्टेंबर महिन्यात पहिल्या १२ दिवसांत मलेरियाचे २१०, लेप्टोचे १८, डेंग्यूचे ८५, गॅस्ट्रोचे ९२, हेपेटायटिसचे १४, एच १ एन १ चे ६ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आढळून आलेले ८५ रुग्ण भायखळा ई वॉर्ड, वरळीच्या जी साऊथ, दादर धारावीच्या जी नॉर्थ या तीन विभागात आढळून आले आहेत. पालिकेच्या किटक नाशक विभागाने डेंग्यू, मलेरिया आदीच्या आळ्या शोधण्यासाठी ४ लाख ४६ हजार ७७ घरांना भेटी देऊन आळ्या भेटलेली ४ हजार १०८ स्थळे नष्ट केली आहेत.
ही घ्या काळजी -
पावसाळी आजार हे विशेष करून मच्छर आणि डास यांच्यामुळे होतात. मच्छर आणि डास यांच्या आळ्या निर्माण होतील अशा टिन, थर्माकॉल बॉक्स, नारळाच्या करवंटी, भंगारात पडलेली टायर्स या वस्तू घराच्या आजूबाजूला जमा करू नका. घरात मच्छर, डास येऊन चावू नयेत म्हणून मच्छरदाणी वापरावी, खिडक्यांना जाळी लावावी, अंग झाकले जाईल असे कपडे वापरावेत. ताप, डोकेदुखी, अंगावर चट्टे, अंगदुखी आणि सांधेदुखी या सारखे आजार झाल्यास स्वतः औषधे न घेता डॉक्टरांकडून किंवा पालिकेच्या दवाखान्यात तपासून औषधे घ्यावीत असे आवाहन पालिकेने केले आहे.