महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पालिका रुग्णालयात महाराष्ट्र सुरक्षा दलातील ७८७ सुरक्षारक्षकांची होणार नियुक्ती, डॉक्टरांना होणारी मारहाण रोखण्यासाठी निर्णय - Nair Hospital

महापालिकेची २३ रुग्णालये असून या रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी १०२ मुख्य सुरक्षारक्षक, १०२ शस्त्रधारी सुरक्षारक्षक आणि ५८३ सुरक्षारक्षकांची फौज तैनात करण्यात येणार आहे.

लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालय

By

Published : Jul 13, 2019, 4:26 PM IST

मुंबई - रुग्णालयात डॉक्टरांना होणारी मारहाण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक महामंडळातील तब्बल ७८७ सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाकडून २ वर्षे सुरक्षारक्षकांची सेवा घेण्यासाठी पालिका ४४.४२ कोटी रुपये खर्च करणार आहे. या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालय

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील मुलाच्या चोरीचे प्रकरण आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना होणारी मारहाण प्रकरणानंतर पालिका रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आली. मात्र, नातेवाईकांकडून मारहाणीचे प्रकार वाढत असल्याने या सुरक्षेत अजून वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पालिकेने केईएम, लोकमान्य टिळक आणि नायर या मुख्य रुग्णालयासह पालिकेच्या इतरही रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा फेरआढावा घेतला. या रुग्णालयांमध्ये फक्त सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणाअंती या रुग्णालयांमध्ये ७८७ सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

महापालिकेची २३ रुग्णालये असून या रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी १०२ मुख्य सुरक्षारक्षक, १०२ शस्त्रधारी सुरक्षारक्षक आणि ५८३ सुरक्षारक्षकांची फौज तैनात करण्यात येणार आहे. रुग्णालयांच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक, मुख्य सुरक्षारक्षक आणि शस्त्रधारी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सुरक्षाव्यस्थेसाठी पालिकेला प्रतिमहिना १ कोटी ८५ लाख ९ हजार रुपये खर्च येणार आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक महामंडळाची सुरक्षाव्यस्था रुग्णालयांमध्ये १ वर्ष तैनात करण्यासाठी २२ कोटी २१ लाख ८ हजार रुपये, तर २ वर्षांसाठी ४४ कोटी ४२ लाख रुपये १६ हजार रुपये पालिकेला मोजावे लागणार आहेत. दरम्यान, याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे केईएम, लोकमान्य टिळक, नायर या ३ रुग्णालयांमध्ये यापूर्वी नियुक्त केलेल्या ४०० सुरक्षा कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details