महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Water Supply : मुंबईच्या धरणात ७५ टक्के पाणी साठा, एप्रिलपर्यंत मुंबईकरांना पाण्याचे "नो टेंशन"

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. गेल्या १६ दिवसात ७५ टक्के धरणे भरली आहेत. मुंबईला २८१ दिवस म्हणजेच एप्रिल महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

dam
धरण

By

Published : Jul 15, 2022, 7:10 PM IST

मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. गेल्या १६ दिवसात ७५ टक्के धरणे भरली आहेत. मुंबईला २८१ दिवस म्हणजेच एप्रिल महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे मुंबईकरांना एप्रिल महिन्यात पर्यंत पाण्याचे टेन्शन मिटले आहे. आतापर्यंत मोडक सागर व तानसा ही दोन धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. असाच पाऊस सुरू राहिल्यास येत्या ५ ते ७ दिवसात १०० टक्के धरणे भरुन ओव्हर फ्लो होऊ शकतात.

७५ टक्के धरणे भरली -मुंबईत २९ जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. २९ जूनला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांमध्ये १ लाख ४७ हजार ६ दशलक्ष लिटर म्हणजेच १०.१६ टक्के पाणीसाठा होता. आज १५ जुलैला सकाळी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १०,८२,८६२ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरणांमध्ये सध्या ७४.८२ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. २९ जून ते १५ जुलै या दरम्यान ६४.६६ टक्के म्हणजेच ९,३५,८५६ दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली. सध्या धरणात २८१ दिवसांचा पाणी साठा आहे. मुंबईला ९ महिने पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे.


दोन धरणे भरली -मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी १३ जुलैला मोडक सागर तर १४ जुलैला तानसा धरण भरुन वाहून लागले आहे.


३.६४ लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज -मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण भरण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सध्या धरणांमध्ये १० लाख ८२ हजार ८६२ दशलक्ष लिटर पाण्याचा साठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे भरायला केवळ ३ लाख ६४ हजार ५०१ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे.


३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा -मुंबईला वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसामुळे हा पाणीसाठा जमा होत होता. मात्र यंदा जून महिन्यात समाधान कारक पाऊस पडलेला नाही. यामुळे २७ जून रोजी १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती, ८ जुलैला धरणात २५ टक्के पाणी साठा जमा झाल्यावर पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.धरणांतून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. त्यामधील ठाणे, भिवंडी महानगरपालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या १० टक्के पाणी कपात असल्याने ३४६५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात आहे.


पाणीसाठा

२९ जूनला १,४७,००६ दशलक्ष लिटर (१०.१६ टक्के)


१२ जुलैला पाणीसाठा

२०२२ मध्ये १०,८२,८६२ दशलक्ष लिटर (७४.८२ टक्के)

२०२१ मध्ये २,५०,०८१ दशलक्ष लिटर (१७.२८ टक्के)

२०२० मध्ये ३,६१,१११ दशलक्ष लिटर (२२.९५ टक्के)



धरणातील पाणीसाठा -

अप्पर वैतरणा १,४२,२५३ दशलक्ष लिटर

मोडक सागर १,२८,९२५ दशलक्ष लिटर

तानसा १,४४,८८७ दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा १,४५,१८६ दशलक्ष लिटर

भातसा ४,९६,१७५ दशलक्ष लिटर

विहार १७,७७८ दशलक्ष लिटर

तुलसी ७,६५८ दशलक्ष लिटर

ABOUT THE AUTHOR

...view details