मुंबई -राज्यातील 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या आणि पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुण-तरुणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य लोकसेवा आयोगाने पीएसआय पदाच्या भरतीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पीएसआय पदाची मुलखात देण्यासाठी आता शारीरिक चाचणीमध्ये 60 गुण अनिवार्य असणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीच्या मानकांमध्ये बदल करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आले आहेत. आयोगातर्फे शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण (म्हणजे ६० गुण) अवश्यक आहेत. शारीरिक चाचणीमध्ये 60 गुण असल्याशिवाय पीएसआय पदाची मुलखात देता येणार नाही. त्यामुळे आता पीएसआय भरतीमध्ये पुर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणी या सर्व परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवार मुलाखतीस पात्र ठरणार आहे.