मुंबई - मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेले दोन वर्षे कोरोनाच्या प्रसारामुळे हा उत्सव निर्बंधांमध्ये साजरा करावा लागला होता. मात्र, आता निर्बंध हटवल्याने पुन्हा एकदा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी केवळ ५३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपाच्या परवानगीसाठी अर्ज केले आहेत. यातील १८५ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेचे गणेशोत्सव समन्वय उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली.
५३० अर्ज दाखल -अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी मंडळांची तयारी सुरु झाली आहे. प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्जांच्या परवानग्यांमध्ये वाहतूक, स्थानिक पोलीस तसेच मुंबई महापालिकेच्या कार्यालयीन परवानगीचा समावेश असतो. मंडप उभारण्यासाठी पालिकेकडे गणेशोत्सव मंडळांकडून परवानग्यांसाठी अर्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेकडे आतापर्यंत ५३० अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी १८५ अर्जांना महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. तर, २५४ अर्ज परवानगीच्या प्रक्रियेत आहेत. ५६ दुबार अर्ज आले आहेत. तर अपू-या कागदपत्रांमुळे ३५ अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
परवान्याच्या समन्वयासाठी मंडळ-प्रशासनाचा व्हॉट्सअॅप ग्रुप -पालिकेने गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, काही मंडळांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सर्व २४ वॉर्डच्या सर्व मंडळांचा समावेश असलेला स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करावा अशी मागणी पालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत समन्वय समितीकडून करण्यात आली होती. याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी सांगितले.