मुंबई - २६ नोव्हेंबर २००८ हा मुंबईच्या इतिहासातील एक काळा दिवस. संपूर्ण देशाला हादरा देणारा असा दहशतवादी हल्ला होता तो. या हल्ल्याचा प्रतिकार करताना देशाने अनेक लढवय्ये योद्धे गमावले. या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या हल्ल्यात महाराष्ट्राने चार पोलीस अधिकारी असणारे रत्न गमावले.... कोण आहेत हे मुंबईला वाचवणारे लढवय्ये खरे हिरो? वाचा सविस्तर-
हेमंत करकरे - २६/११च्या त्या रात्री मुंबईचे एटीएस प्रमुख हेमंत करकरे ( Hemant Karkare ) यांना क्राइम ब्रांचने मुंबईवर हल्ला झाल्याचे सांगण्यात आले. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याचे कळताच हेमंत करकरे लगेचच घरातून निघाले. अजमल कसाब आणि इस्माईल कामा रुग्णालयाबाहेर अंधाधुंद गोळीबार करत होते. या गोळीबाराची माहिती मिळताच विजय साळसकर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे तिथे पोहचले. दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंची गाडी समोरुन दिसताच त्यांनी गाडीवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. करकरे यांनी छत्रपती टर्मिनल रेल्वे स्टेशनवर दहशतवाद्यांवर गोळ्या झाडल्या. यात तीन दहशतवादी मारले गेले. याच गोळीबारात अजमल कसाब जखमी झाला होता. पुढे करकरे यांच्या व्युहरचनेमुळे कसाबला पकडण्यात पोलिसांना यश आले. (2009)साली हेमंत करकरे यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले.
----------------------------------------------------------------------
तुकाराम ओंबाळे -मुंबई पोलीस दलातील एएसआय तुकाराम ओंबळे ( Tukaram Ombale ) यांनी आपल्या प्राणाची आहुती देत दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडून दिले होते. ओंबाळे हे भारतीय सेनेतील निवृत्त सैनिक होते. निवृत्तीनंतर ते मुंबईच्या पोलीस खात्यात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. त्यांचा (२००८)मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान मृत्यू झाला. २६ जानेवारी २००९ रोजी तुकाराम ओंबाळे यांना अशोक चक्र हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला पकडण्याचे श्रेय तुकाराम ओंबाळे यांना जाते. ओंबळे हे मुंबई पोलीसात साहाय्यक पोलीस निरीक्षक होते. मुंबईवर २६/११/२००८ रोजी झालेल्या हल्ल्याच्या काळात त्यांची तुकडी सशस्त्र नव्हती. अत्यंत तुटपुंज्या शस्त्रांच्या मदतीने त्यांच्या तुकडीने दोनपैकी एका अतिरेक्यास ठार मारले. अजमल कसाब या अतिरेक्यास पकडताना तुकाराम ओंबाळे यांचा मृत्यू झाला. निःशस्त्र असलेल्या ओंबाळे यांनी जखमी अजमल कसाबची बंदूक धरून त्याला अटक करण्यास अधिकाऱ्यांना मदत केली. पण त्याचवेळी कसाबने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्यांचा अंत झाला. हल्ल्याच्या दिवशी तुकाराम ओंबाळे हे रात्रीच्या पहाऱ्यावर होते. २७ नोव्हेंबर रोजी मध्य रात्री १२:३० वाजता त्यांनी घरी शेवटचा फोन केला होता. अतिरेकी हल्ल्याची खबर मिळताच ते गिरगाव चौपाटीकडे धावले. चौपाटी रोडवर नाकाबंदी करत असतानाच तेथे एक संशयास्पद वाटणारी गाडी थांबली. दोन पोलीस लाठी घेऊन गाडीकडे गेले असता, त्यांना दोन अतिरेकी दिसले, इस्माईल नामक एका अतिरेक्यास जागीच ठार मारण्यात आले. दुसरा अतिरेकी अजमल कसाब जखमी अवस्थेत दिसला. कसाबने प्रथम शरणागती पत्करल्याचे नाटक केले, व जसे ओंबाळे गाडीजवळ गेले, तसे त्याने "ए के ४७" बंदुकीने सर्व पोलिसांवर निशाणा साधला. हे लक्षात येताच ओंबाळेंनी जिवाची पर्वा न करता बंदुकीवर झडप घातली, त्यामुळे बाकीच्या पोलिसांचे प्राण वाचले पण त्या दरम्यान ओंबाळेंच्या शरीरात २० गोळ्या गेल्या होत्या, ते बेशुद्ध पडेपर्यंत बंदुकीसमोर होते, त्यामुळे बाकीच्या पोलिसांनी कसाबला जागेवर पकडले. तुकाराम ओंबाळे यांच्यामुळे मुंबईवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब पकडला गेला, पण त्या बदल्यात ओंबाळेंना स्वत्ःच्या प्राणांची आहुती द्यावी लागली.