मुंबई -विलीनीकरणाच्या मागणीवर गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर ( ST Workers Strike ) आहेत. कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळाने अखेर निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आज महामंडळाने 174 निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आत बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 415 वर पोहचली ( Suspended ST Employees Dismissed ) आहे. याशिवाय आतापर्यत महामंडळाने 10 हजार 731 कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून या निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणेदाखवा नोटीस बजावली जात आहे.
बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 415 वर -
एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरू असलेला संप दिवसेंदीवस चिघळत आहे. दोन महिने होऊनही एसटीचा संप सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने ( MSRTC ) कारवाई सुरू केली आहे. महामंडळाने आतापर्यंत राेजंदारीवरील अडीच हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून 10 हजार 731 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय 2 हजार 796 कर्मचाऱ्यांचा बदल्या केल्या आहे. मात्र, निलंबनाच्या कारवाई नंतरही कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. निलंबित कामगारांना आतापर्यंत मंडळाकडून दोन वेळा संधी देण्यात आलेली होती. मात्र, संधी देऊनही निलंबित कर्मचारी कामावर हजर झाले नाही. त्यामुळे आता निलंबित कामगारांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून देण्यात सुरुवात केली आहे. गेल्या 15 दिवसांत 600 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस महामंडळाकडून बजवाली आहे. तर सोमवार (दि. 27) महामंडळाने 174 निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 415 वर पोहोचली आहे.