मुंबई -राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आतापर्यंत मागील पाच महिन्यांत मंत्रालयात 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अधिकाऱ्यांच्या मंत्रालयातील शंभर टक्के उपस्थिती संदर्भात सरकारने काढलेल्या आदेशाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी अधिकारी-कर्मचारी महासंघाकडून केली जात आहे.
मंत्रालयात मागील काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीतील मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह आणि त्यांच्या कार्यालयातील अनेक अधिकारी कर्मचारी हे कोरोनाबाधित झाले होते. यामुळे अनेक कार्यालयांना काही दिवस बंद ठेवण्यात आले होते. तर, नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनापूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालयात तब्बल 10 जणाला कोरोनाची बाधा झाली होती. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या कार्यालयातील काही कर्मचारीही बाधित झाले होते. काल नितीन राऊतही स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हेही कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
मंत्रालयात मागील काही महिन्यांपासून सनदी अधिकाऱ्यांचा सोबतच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आल्यामुळे याविषयी अधिकारी-कर्मचारी महासंघाकडून वेळोवेळी आक्षेप घेण्यात आले होते. तर दुसरीकडे, ब आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांना मात्र ३० टक्के उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा -...तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते - माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे