मुंबई- सत्तास्थापनेचा पेच अजूनही सुटलेला नाही. तसेच राज्यातील सर्वच पक्षांना सत्तासथापनेसाठी यश न आल्यामुळे अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस अशी शिवआघाडी सत्तास्थापनेसाठी डावपेच रचत आहे. यातही शिवसेना भाजपवर टीका करण्याची संधी सोडत नाही. सामनाच्या रोजच्या अग्रलेखातून भाजपवर बाण सोडला जातो. महाराष्ट्रात चार वेगवेगळ्या भूमिकांचे पक्ष आपापले पत्ते हाती घेऊन पिसत आहेत. राजभवनाच्या हाती ‘एक्का’ नसतानाही त्यांनी तो फेकला. जुगारात असे बनावट पत्ते फेकून डाव जिंकण्याचे प्रयत्न आतापर्यंत सफल झालेले नाहीत आणि महाराष्ट्र ही काही जुगारावर लावण्याची ‘चीज’ नाही, असे म्हणत सेनेने पुन्हा एकदा भाजपलाच लक्ष्य केले आहे. तसेच सत्तास्थापनेसाठी 48 तासही देणार नसाल तर 'दया कुछ तो गडबड है' असे जनतेला वाटत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
हेही वाचा -मुंबईच्या महापौर पदासाठी 'या' नगरसेवकांच्या नावाची चर्चा
'सामना'तून भाजपवर सोडलेला बाण -
महाराष्ट्रानं आतापर्यंत कोणावरही मागून वार केले नाहीत. अफझल खानाचा कोथळाही समोरून काढला आहे. निखाऱ्याशी खेळू नकाच, पण कोळसा म्हणून हाती निखारा घ्याल तर चटकेही बसतील व तोंडही काळे करून घ्याल. आम्ही कोणत्याही संघर्षाला तयार आहोत.
राज्यात राष्ट्रपती राजवटीचा वरवंटा अखेर फिरवला आहे व त्याबद्दल कोणी मगरीचे अश्रू ढाळीत असतील तर त्याकडे एक ‘फार्स’ म्हणून पाहायला हवे. राष्ट्रपती राजवट दुर्दैवी असल्याची कळ माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मनात आली आहे.
राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्रात होणाऱ्या गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होईल अशी चिंता माजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. हे त्यांचे नक्राश्रू आहेत. वास्तविक सरकार स्थापनेसाठी किमान चोवीस तास तरी वाढवून मिळावेत अशी भूमिका घेऊन राजभवनात पोहोचलेल्या नेत्यांच्या बाबतीत जेथे राजशिष्टाचाराचेच पालन झाले नाही तेथे चोवीस मिनिटे तरी वेळ वाढवून मिळाला असता काय? ठीक आहे. आम्ही थोडा वेळ मागितला, परंतु दयावान राज्यपालांनी आता राष्ट्रपती राजवट लागू करून भरपूर वेळ दिला आहे. अर्थात महाराष्ट्रावर हा जो राष्ट्रपती राजवटीचा वरवंटा फिरवला गेला आहे याची पटकथा जणू आधीच लिहून ठेवली होती. विधानसभा सहा महिन्यांसाठी संस्थगित करून राज्यपालांनी प्रशासकीय सूत्रे राजभवनाकडे घेतली आहेत. आता सल्लागारांच्या मदतीने ते इतक्या मोठ्या राज्याचा कारभार हाकतील. राज्यपाल हे अनेक वर्षे संघाचे स्वयंसेवक होते. उत्तराखंड या पहाडी राज्याचे ते मुख्यमंत्री राहिले आहेत, पण महाराष्ट्र वेगळे राज्य आहे. आकाराने आणि इतिहासाने ते भव्य आहे. येथे वेडेवाकडे काही चालणार नाही.
हेही वाचा -उद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
राष्ट्रपती राजवट लादली म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता परिवारातच राहिली. त्यामुळे मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश आहेत हे त्यांच्या आनंदी चेहऱ्यावरून दिसत आहे. आता सरकार कोणी व कसे बनवायचे? राष्ट्रपती राजवटीचा खेळखंडोबा लवकरात लवकर कसा दूर करायचा हाच प्रश्न आहे. जे शिवसेनेच्या बाबतीत झाले तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडले. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी रात्री साडेआठपर्यंतची मुदत दिली गेली होती, पण थोडा वेळ वाढवून दिला तर बरे होईल असे विचारताच ‘8.30’ सोडाच, पण भरदुपारीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. अहो, निदान तुम्हीच दिलेल्या वेळेपर्यंत तरी थांबायचे होते, पण जणू कोणी तरी एखादी ‘अदृश्य शक्ती’ हा सर्व खेळ नियंत्रित करीत होती व त्याबरहुकूम सर्व निर्णय होत होते. देशाचे माहीत नाही, पण महाराष्ट्राच्या परंपरेस हे शोभेसे नाही. राज्यपाल येतील आणि जातील, पण महाराष्ट्र तेथेच राहणार आहे.