रेल्वे वर्कशॉपमध्ये १३१ जणांना कोरोनाची लागण.. रेल्वे वाहतुकीवर होणार परिणाम ! - रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये कोरोनाचा शिरकाव
पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ कारखान्यात ६२ कर्मचारी आणि महालक्ष्मी वर्कशॉपमध्ये ६९ असे एकूण १२१ रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसात कोरोना आणि ओमायक्रोनचा संसर्ग वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यावर बंदी आहे. परंतु रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. . त्यामुळे आता रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुंबई- गेल्या काही दिवसात कोरोना आणि ओमायक्रोनचा संसर्ग वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यावर बंदी आहे. परंतु रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत असून पश्चिम रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये १३१ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी -
मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ कारखान्यात ६२ कर्मचारी आणि महालक्ष्मी वर्कशॉपमध्ये ६९ असे एकूण १२१ रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. रेल्वेच्या कारखान्यात अलीकडे बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावली जात आहे. यात मास्क काढून चेहरा मशीनवर दाखवून कारखान्यात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे अडीच ते तीन हजार कामगारांना रांगेत उभे राहून हे सोपस्कार दररोज पूर्ण करण्यासाठी घरातून लवकर निघावे लागत आहे. कोरोना काळात 'सोशल डिस्टन्सिंग राखण्याचे आदेश असताना कारखान्यात मात्र बायोमेट्रिकसाठी मोठी गर्दी उसळत आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आम्हाला काळजी-
याबाबत आम्ही पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांना विचारणा केली असताना त्यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, आम्ही रेल्वे कर्मचाऱ्यांची पुरेपूर काळजी घेत आहोत. कर्मचाऱ्यांना आरोग्यासाठी आम्ही एक मेडिकल तपासणी मोहीम हाती घेतली होती. यात लोअर परळ कारखान्यात ६२ कर्मचारी आणि महालक्ष्मी वर्कशॉपमध्ये ६९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांची आम्ही पुरेपूर काळजी घेत आहोत. तर एका रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेने कोरोनाविषयक एसओसी जाहीर केली असून गर्दी कमी करण्याचे आवाहन केले असतानाही केवळ महाव्यवस्थापकांचे आदेश नसल्याने रेल्वेच्या कारखान्यात बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावली जात आहे. रेल्वेने तात्काळ बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावणे बंद करावेत. अन्यथा रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येईल.
आतापर्यत ८४ जणांचा मृत्यू -
सध्या पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयात ४९ कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. जगजीवन राम रुग्णालयात एप्रिल २०२० से डिसेंबर २०२१ यादरम्यान दोन हजार ३ कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांवर उपचार झाले. यापैकी एक हजार ९०७ जण उपचार पूर्ण होऊन घरी गेले, तर ८४ जणांचा मृत्यू झाला आणि अन्य १२ जणांची इतर रुग्णालयांत रवानगी करण्यात आली आहे.