मुंबई -मुंबईत मागील मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आज मुंबईत 10 हजार 600 लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा जास्त 122 टक्के म्हणजेच 12 हजार 907 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 2 लाख 41 हजार 747 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोविन ऍपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्या तरी मुंबईत उद्दिष्टापेक्षा जास्त लसीकरण करण्यात आले आहे.
लसीकरणाची आजची आकडेवारी
मुंबईत आज 26 लसीकरण केंद्रांच्या 106 बूथवर एकूण 10 हजार 600 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा 122 टक्के अधिक म्हणजेच 12 हजार 907 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यातील 10 हजार 194 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 713 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आज एकूण 3 हजार 804 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, त्यात 1091 कर्मचाऱ्यांना पहिला तर 2713 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. 2 हजार 250 फ्रंटलाईन वर्कर, 45 ते 59 वर्षांमधील विविध आजार असलेल्या 590 तर 60 वर्षांवरील 6263 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. दरम्यान लसीकरणाचा 6 जणांवर सौम्य दुष्परिणाम झाला आहे. आतापर्यंत 2 लाख 15 हजार 207 लाभार्थ्यांना पहिला तर 26 हजार 540 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 2 लाख 41 हजार 747 लाभार्थ्यांना लसीचा डोस देण्यात आला आहे.