मुंबई - मुंबईत कोरोना, ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने पसरू लागला असून अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात याचा संसर्ग होताना पाहायला मिळत आहे. डॉक्टर्स तसेच, पोलीस दलातील अधिकारी यांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे. 24 तासांमध्ये 120 पोलीस कर्मचाऱ्यांना ( 120 Mumbai police found corona positive ) कोरोनाची लागण झाली आहे. तर, एका पोलास कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलीस अंमलदारांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोरोनाची लागण होऊ लागली आहे. सद्यस्थितीत 13 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लागण झाली आहे. तर, 643 अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील कोविड झाला आहे. मात्र, सर्वांची प्रकृती ठीक असून बरे होण्याचे प्रमाणदेखील चांगले आहे. 101 पोलीस हॉस्पिटलमध्ये दाखल असून हा आकडा खाली घसरला आहे. तर, 450 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. 57 जणांना दुसऱ्या डोसनंतर कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाली असली तरी, अधिकारी, अंमलदारांची प्रकृत्ती ठीक असून चिंतेची बाब नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दुर्दैवाने तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबई पोलीस दलातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. गृह विभागाकडून पोलीस दलातील अधिकाऱ्यांकरिता व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश गृह विभागाकडून देण्यात आले आहे. तर, अनेक आजाराने ग्रस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये, असे आदेश देखील देण्यात आले आहे. तरी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी हे पॉझिटिव्ह होत असल्याची माहिती समोर येत आहे.