मुंबई -एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी बंडखोरी करत शिवसेनेत भगदाड पाडल्यानंतर आता खासदार शिंदेच्या वाटेवर आहेत. शिंदे यांचे बंड थंड झाले असताना आता एकूण 11 खासदार लवकरच शिंदे यांच्या गटात सामील होणार अशी शक्याता आहे. त्यामुळे हा शिवसेनेसाठी तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा असणार आहे.
११ खासदार शिंदे गटात होणार सहभागी? राज्यात महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सरकारने अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले होते. तेव्हा सेनेचे ५० आमदार शिंदे गटात सहभागी होते. शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर त्यांना राज्याचे मुख्यमंत्री पद मिळाले. आता शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हादरा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या सेनेचे १८ खासदार आहेत. त्यापैकी ११ खासदार शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
हेही वाचा -Bhavana Gawali : महाराष्ट्रातील झटक्यानंतर शिवसेना सावध; प्रतोद पदावरुन भावना गवळींची उचलबांगडी
खासदार शेवाळे यांचे पत्र उघड -राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेच्या काही खासदारांनी याविरोधात भूमिका घेतली आहे. मुंबईतील खासदार राहुल शेवाळे ( MP Rahul Shewale ) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची उघडपणे मागणी केली आहे. अशातच बंडखोर आमदारांकडून अनेक खासदार संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. बंडखोर आमदार आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी ११ आमदार संपर्कात असल्याचे जाहीर केले होते. खासदार शेवाळे यांच्या उघड पत्रामुळे खासदारांच्या बंडखोरीच्या वृत्ताला दुजोरा मिळतो आहे.